जिल्ह्यातील २५ हजारांवर शिक्षकांपुढे उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न; शाळा अनलॉकचे लागले वेध

संतोष विंचू
Sunday, 11 October 2020

खासगी शाळांच्या शिक्षकांचे वेतन पूर्णतः विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कावरच अवलंबून असते. अनेक मोठ्या संस्थांनी आतापर्यंत शिक्षकांना अर्धा किंवा ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पगार दिलेत. मात्र जसाजसा एक एक महिना जातोय तसे संस्थांचेही अर्थकारण डबघाईस आल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. 

नाशिक : (येवला) अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया पूर्ण नाही, ज्यांचे प्रवेश झाले आहे ते शुल्क भरत नाही, संस्थाचालकांकडून वेतन देण्यासाठी आता आर्थिक जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे जिल्ह्यात खासगी व विनाअनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या इंग्रजी माध्यमापासून ते थेट अभियांत्रिकीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालयांच्या २५ हजार शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. 

२५ हजारांवर शिक्षकांपुढे उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न 

सहा महिन्यांपासून शाळा बंद असल्याने उत्पन्नही ठप्प झाल्याने संस्थाचालकही हतबल झाले आहेत. दिवाळीपूर्वीच शिक्षकांचे दिवाळे निघाले असून, आर्थिक आधार मिळण्यासाठी आता तरी शाळा-महाविद्यालय सुरू होण्याचे वेध बिनपगारी शिक्षकांना लागले आहे. जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले खरे, मात्र ते अद्यापही कागदावरच आहे. याकाळात अनुदानित शाळांच्या वेतनाचा प्रश्न सतावत नाही. मात्र जिल्ह्यात अनुदानितच्या तुलनेत विनाअनुदानित व खासगी तत्त्वावर चालणाऱ्या इंग्लिश मीडियम, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, फार्मसी, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या शिक्षण संस्थांची आणि शिक्षकांची संख्या दुपटीने आहे. 

संस्थांचेही अर्थकारण डबघाईस आल्याने परिस्थिती गंभीर

जूननंतर अनेक अभ्याक्रमांसाठी प्रवेशप्रक्रियाही झाल्या. सुमारे ५० टक्के पालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश घेतलेले नाही. काहींनी प्रवेश घेतले; मात्र प्रवेश शुल्क भरलेले नसल्याने संस्थांना शिक्षकांचा पगार कसा करावा? हा प्रश्न सतावत आहे. खासगी शाळांच्या शिक्षकांचे वेतन पूर्णतः विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कावरच अवलंबून असते. अनेक मोठ्या संस्थांनी आतापर्यंत शिक्षकांना अर्धा किंवा ७५ टक्‍क्‍यांपर्यंत पगार दिलेत. मात्र जसाजसा एक एक महिना जातोय तसे संस्थांचेही अर्थकारण डबघाईस आल्याने परिस्थिती गंभीर होत आहे. 

वेतनच नसल्याने घर कसे चालवावे? हा प्रश्न

जिल्ह्यात आठ ते दहा हजारांवर इंग्लिश मीडियमसह कनिष्ठ महाविद्यालय, खासगी शाळांमध्ये ज्ञानार्जन करणारे दहा ते पंधरा हजार शिक्षक असून, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, फार्मसी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी चार ते सहा हजार शिक्षक ज्ञानार्जन करतात. आवकच नसल्याने या सर्वांना वेतन कसे द्यावे, हा प्रश्न आता संस्थाचालकांना पडला आहे. वेतनच नसल्याने घर कसे चालवावे? हा प्रश्न या शिक्षकांपुढे उभा राहिला आहे. यामुळे जगण्याच्या लढाईला बळ मिळण्यासाठी या शिक्षकांचे शाळांचे अनलॉक केव्हा होईल आणि कुलूप उघडून वर्ग केव्हा भरतील, याकडे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय 
अभ्यासक्रम महाविद्यालय संख्या 

अभियांत्रिकी १९ 
तंत्रनिकेतन २४ 
बी. फार्म. २४ 
डी. फार्म. ३० 
बी. आर्कि. ४ 
बी.एस्सी. ॲग्री. ४ 
बी.एस्सी. होर्टी. १ 
बी.टेक. (बायो.) १ 
बी.टेक. (फूड) १ 
बी.टेक. (ॲग्री.) १ 
हॉटेल मॅनेजमेंट १ 
एमबीए २२ 
बी.एड. २१ 

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

डी.एड. ३५ 
एम.एड. २ 
बी.एस्सी. नर्सिंग ६ 
बीएएमएस ४ 
बीएचएमएस ४ 
एमबीबीएस २ 
बीडीएस २ 
आयटीआय ३३ 
(शासकीय - १५, खासगी : १८) 
वरिष्ठ महाविद्यालय १८९ 
कनिष्ठ महाविद्यालय ४२८ 
कृषी पदविका १० 
पशुधन दुग्धोत्पादन पदविका ४ 
इंग्लिस मीडियम स्कूल ५००  

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, खासगी शाळांपुढे आता खर्च भागवण्याचा प्रश्न उभा आहे. शासनाने या अडचणीच्या काळात विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना आधार देण्यासाठी स्वतंत्र निधी जाहीर करावा व शिक्षकांचे आर्थिक संकट दूर करण्यासाठी आधार द्यावा. - मकरंद सोनवणे, संचालक, अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ 

संपादन - किशोरी वाघ

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: question of subsistence in front of 25 thousand teachers in the district nashik marathi news