बळीराजाचा प्रतिसाद; मात्र यंत्रणा ठप्पच! कृषी यांत्रिकीकरण उपअभियान नोंदणी प्रक्रिया धिम्म

farmer.png
farmer.png

नाशिक : (खेडलेझुंगे) शेतीच्या आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरलेल्या कृषी यांत्रिकीकरण उपअभियानासाठी लाभार्थी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू आहे. योजेनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागात बळीराजा रांगा लागून अर्ज करत आहे. ऑनलाइन अर्जासाठी असलेले पोर्टलच कार्यान्वित नसल्याने शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे.

कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत अर्जासाठी रांगा 
 
शेतीच्या आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने शासनाकडून अर्थसहाय्य दिले जात आहे. या योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या अर्थसहाय्याने विविध कृषी उपयोगी योजनांची अंमलबजावणी केली जात असून, २०२०-२१ साठी राज्यात या योजनेद्वारे साधारणतः ९४ कोटींचा निधी वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे. योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी ५० टक्क्यांपर्यंत किंवा एक लाख २५ हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या प्रवर्गानुसार मिळते. इतरही अवजारांसाठी केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार घोषित केलेली अनुदान मर्यादा लागू असते. यंत्र आणि अवजारे खरेदीसाठी शासनाकडून भरपूर अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरत आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यासाठी शासनाने ‘mahadbtmahait.gov.in’ हे पोर्टल सुरू केले आहे. 

शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ठप्प

सद्यःस्थितीत पोर्टलच व्यवस्थित कार्यान्वित न झाल्याने शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया ठप्प आहे. त्यात कृषी यांत्रिकीकरण उपअभियानाचे अर्ज जवळपास तीन महिने उशिराने सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. नाराजी दुर्लक्षित करून शेतकरी अर्ज सादर करण्यासाठी रांगा लावून आपले सरकार सेवा व सीएससी केंद्रात गर्दी करत आहे. परंतु तेथेही जबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणीमुळे दिवसभर थांबूनसुद्धा अर्ज भरला जात नसल्याने शेतकऱ्यांना सततचे फेरे मारावे लागत आहे. त्यामुळे पोर्टलवरील तांत्रिक समस्यांचे तत्काळ निवारण करून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करावी, अशी मागणी केंद्र संचालक व शेतकरी यांच्याकडून होत आहे. 

अर्ज करताना अनेकदा पोर्टलच्या कनेक्टिव्हिटीत अडथळा येत असून, अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने आम्ही सर्व केंद्र चालक अक्षरश: हैराण झालो आहेत. तरी संबंधित विभागाने याची दखल घेऊन ही अडचण लवकरात लवकर दूर करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. - विशाल घोटेकर, सीएससी केंद्र संचालक 

शेतकऱ्यांच्या फायद्याची योजना असल्याने दिवसभरात शेकडो शेतकरी अर्ज सादर करण्यास येत आहेत. पोर्टलवर तांत्रिक अडचण निर्माण होत असल्याने त्यातील फक्त एक-दोन अर्ज भरले जात असल्याने केंद्रस्थळी शेतकरी गर्दी करत आहे. आरोग्याच्या दृष्टीने हे घातक आहे. - अनिल आहेर संचालक, आपले सरकार सेवा केंद्र, विंचूर 

कोरोना महामारी व अतिवृष्टी यामुळे आधीच शेतकरी अडचणीत असताना शेतकरी हिताच्या योजनाच्या अंमलबजावणीबाबत सरकारची उदासीनता दिसून येते, ही निश्चित खेदाची आणि चिंताजनक बाब आहे. - सुधीर गिते, शेतकरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com