‘ट्रेड वॉर’च्या झळा; राफेलमुळे रशियाची भारतीय द्राक्षांवर वक्रदृष्टी? शेतकऱ्यांचा संताप

महेंद्र महाजन
Monday, 5 October 2020

निर्यात झालेल्या ४१ कंटेनरमध्ये रशियामध्ये कीड सापडल्याची माहिती पुढे आल्याने कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेनरमध्ये असलेल्या कमी तापमानात कीड येत नाही, मग ती कोठून आली? या प्रश्‍नाने निर्यातदार त्रस्त आहेत. रशियासाठी दीड हजार कंटेनरची निर्यात झाली होती. युरोपला सात हजार कंटेनरची निर्यात झाली होती.

नाशिक : रशियामधील द्राक्षांची निर्यात वाढीस लागलीय. गेल्या वर्षी द्राक्षांचे कंटेनर रशियात अडकवण्यात आले. यंदा महाराष्ट्रात नसलेली कीड आढळल्याने १४ निर्यातदार कंपन्या आणि पॅकहाउसवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राफेल विमान खरेदीच्या निर्णयामुळे ‘ट्रेड वॉर'मध्ये रशियाची भारतीय द्राक्षांवर वक्रदृष्टी पडली काय? असा प्रश्‍न बंदीच्या निर्णयामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

राफेलमुळे रशियाची भारतीय द्राक्षांवर वक्रदृष्टी? 
निर्यात झालेल्या ४१ कंटेनरमध्ये रशियामध्ये कीड सापडल्याची माहिती पुढे आल्याने कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. कंटेनरमध्ये असलेल्या कमी तापमानात कीड येत नाही, मग ती कोठून आली? या प्रश्‍नाने निर्यातदार त्रस्त आहेत. रशियासाठी दीड हजार कंटेनरची निर्यात झाली होती. युरोपला सात हजार कंटेनरची निर्यात झाली होती. निर्यातदारांना आणखी एक प्रश्‍न भेडसावतोय तो म्हणजे, युरोपमध्ये कडक निर्बंध असताना तिथे हीच समस्या का आढळली नाही? फलोत्पादन आणि भाजीपाल्याच्या निर्यातीच्या अनुषंगाने भारतीय शेतमालाला प्रश्‍नांच्या मालिकेला सदैव पुढे जावे लागते. युरोपियन युनियनतर्फे पाच वर्षांपूर्वी भारतीय एक फळ आणि चार भाज्यांवर कीडसाठी बंदी घातली होती. त्या वेळी व्हेजनेट ही प्रणाली विकसित करून त्याचे परीक्षण पूर्ण झाल्यावर बंदी उठवण्यात आली होती. शिवाय रशियाने यापूर्वी साखर आणि तांदळासाठी प्रतिबंध केला होता. ती बंदी मागे घेण्यात आली होती. हा सगळा धांडोळा घेतल्यावर निर्यातविषयक अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार रशियाने उचलेल्या पावलाच्या पार्श्‍वभूमीवर १५ हजार कोटींच्या निर्यातीच्या सुरक्षेसाठी क्वारंटाइन टेस्टला महत्त्व द्यावे लागणार आहे. द्राक्षांमध्ये कीड आली कोठून? याचा शोध घ्यावा लागेल, असेही अभ्यासकांनी सांगितले. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

लेखी घेऊन सोडले कंटेनर 
रशियात गेल्या वर्षी फायटोसॅनिटरी सर्टिफिकेटवर ‘पेस्ट-थ्री एरिया’विषयक लेखी घेण्यात आले. त्यानंतर द्राक्षांचे कंटेनर सोडण्यात आले. तसेच बंदरातून कंटेनर पुढे पाठवण्याचा वेग मंद राहिल्याचे निर्यातदारांनी अनुभवले आहे. वास्तविक पाहता द्राक्षांमध्ये जगातील सर्वोत्तम प्रणाली महाराष्ट्रात विकसित करण्यात आली आहे. अन्नसुरक्षा विषयक बाबींमधील रासायनिक उर्वरित अंश आढळणार नाही, याची शंभर टक्के काळजी शेतकरी घेताहेत. आता ‘क्वारंटाइन टेस्ट’च्या अनुषंगाने केंद्र सरकारला गंभीर पावले उचवून त्याची माहिती प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोचवावी लागणार, असे दिसते. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

द्राक्ष निर्यातदार संघटनेचा पाठपुरावा 
द्राक्ष निर्यातदार संघटनेने केंद्रीय कृषी व वाणिज्य मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. रशियात २०१९-२० मधील निर्यातीवेळी काही कीड सापडल्याचा संशय व्यक्त करून रशियाच्या प्लान्ट क्वारंटाइन विभागाने भारतीय प्लान्ट क्वारंटाइन विभागाला कळवले. त्यानुसार नाशिकमधील १४ निर्यातदारांचे परवाने तातडीने निलंबित करण्याचा निर्णय घेऊन संबंधितांवर निर्यात प्रक्रियेवर बंदी घालण्यात आली. मात्र, ज्या कारणाने निलंबन झाले, ती कीड आढळून येत नाही, हे पाठपुराव्यामागील प्रमख कारण आहे. तूर्तास १४ निर्यातदार व संबंधित पॅकहाउससंबंधी कामकाजावर बंदी घालण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. निर्यातदार आपली बाजू मुंबईच्या विभागीय प्लान्ट क्वारंटाइन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मांडणार असल्याचे सांगण्यात आले. 

प्रश्‍नावलीला निर्यातदारांचे उत्तर 
प्लान्ट क्वारंटाइन विभागाच्या पथकाने बैठक घेऊन काही निर्यातदारांच्या पॅकहाउसला भेट दिली. तसेच दहा प्रश्‍नांची प्रश्‍नावली निर्यातदारांना पाठवून त्यांच्याकडून माहिती मागविण्यात आली होती. ज्यामध्ये निर्यातदारांचे नाव, पत्ता, २०१९-२० मधील निर्यातीची आकडेवारी, रशियामध्ये किती वर्षांपासून निर्यात केली जाते?, काम करण्याची कार्यपद्धती, रशियासाठी द्राक्षाची प्रतवारी करताना अथवा नमुना घेताना पॅकहाउसमध्ये कोणतीही कीड आढळली का?, भविष्यात काय खबरदारी घ्याल? असे प्रकार टाळण्यासाठी काही मानक कार्यपद्धती विकसित करण्याची गरज आहे का?, असल्यास त्याबाबत तपशीलवार माहिती या प्रश्‍नांची उत्तरे निर्यातदारांनी प्लान्ट क्वारंटाइन विभागाला पाठवली आहे. 

श्रीलंकेतील निर्यातीवेळी फळ माशीमुक्त असल्याचे लिहून घेतले जाते. त्यामुळे रशियातील निर्यातीतून उद्‌भवलेल्या परिस्थितीत कारवाईने प्रश्‍न सुटणार नाही. पुढील हंगामामध्ये उत्पादक, पॅकिंगवाल्यांना मार्गदर्शन करायला हवे. निर्यातदार आणि शेतकरी बिनधास्त राहत असल्याने ‘सर्व्हिस प्रोव्हायडर’ म्हणून काम पाहणाऱ्यांना ‘क्वारंटाइन टेस्ट’बद्दलची माहिती द्यावी लागेल. - गोविंद हांडे (शेतमाल निर्यात अभ्यासक)  

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raphael causes Russia's bad view of Indian grapes nashik marathi news