जिल्ह्यात दिवसभरात विक्रमी २ हजार ३१० रूग्‍ण कोरोनामुक्त; नवे १ हजार १७६ बाधित

अरुण मलाणी
Thursday, 24 September 2020

गुरूवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये सर्वाधिक १ हजार ६५४ रूग्‍ण नाशिक शहरातील आहेत. तर नाशिक ग्रामीणचे ५८७, मालेगावचे ५७ व जिल्‍हाबाह्य बारा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७४५, नाशिक ग्रामीणचे ३७४, मालेगावचे ४० तर जिल्‍हाबाह्य सतरा रूग्‍ण आहेत.

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून कोरोनामुक्‍त होणाऱ्या रूग्‍णांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे बरे झालेल्‍या रूग्‍णांच्‍या संख्येनेही साठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गुरूवारी (ता. २४) विक्रमी २ हजार ३१० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, बरे झालेल्‍या रूग्‍णांची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. दिवसभरात १ हजार १७६ नवीन कोरोना बाधित आढळून आले, तर चोवीस रूग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. यातून दिवसभरात ॲक्‍टीव्‍ह रूग्‍णांमध्ये १ हजार १५८ रूग्‍णांची घट झाली आहे. 

नाशिक शहराती १ हजार ६५४ रूग्‍ण बरे

गुरूवारी कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये सर्वाधिक १ हजार ६५४ रूग्‍ण नाशिक शहरातील आहेत. तर नाशिक ग्रामीणचे ५८७, मालेगावचे ५७ व जिल्‍हाबाह्य बारा रूग्‍णांनी कोरोनावर मात केली. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७४५, नाशिक ग्रामीणचे ३७४, मालेगावचे ४० तर जिल्‍हाबाह्य सतरा रूग्‍ण आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गेल्‍या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे मृत्‍यूंची संख्याही वाढत असून, गुरूवारी दिवसभरात चोवीस रूग्ण दगावले. यात दहा नाशिक शहरातील, १२ नाशिक ग्रामीणचे तर, मालेगाव आणि जिल्‍हाबाह्य प्रत्येकी एक रूग्णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. यातून आतापर्यंत आढळलेल्‍या कोरोना बाधितांची संख्या ६८ हजार ८२९ वर पोचली आहे. यापैकी ६० हजार २९८ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. तर १ हजार २४९ रूग्‍णांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. सद्यस्‍थितीत ७ हजार २८२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

दरम्‍यान, नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १ हजार ७२३, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८६, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात २९, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात १७, जिल्‍हा रूग्‍णालयात सोळा संशयित रूग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ८८४ अहवाल प्रलंबित होते. यापैकी १ हजार ३२० अहवाल नाशिक ग्रामीण परीसरातील आहेत. 

मालेगावला नव्याने ४९ पॉझिटिव्ह 

मालेगाव : शहर व परिसरात आज नव्याने ४९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ४० तर ग्रामिण भागातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, महापालिकेच्या सहारा कोविड केअर सेंटरमध्ये शहरातील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या १५१ झाली आहे. तालुक्यातील कोरोनाबळींची संख्याही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. महापालिका क्षेत्रात गृहविलगीकरणासह एकूण ५८६ रुग्ण आहेत. आज नव्याने २९ रुग्ण दाखल झाले. रोज फक्त १०० स्वॅब घेतले जात असल्याने दोनशे अहवाल प्रलंबित आहेत. 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: record 2 thousand corona patients cured in a day nashik marathi news