#COVID19 : रक्तदात्यांनी घेतला 'कोरोना'चा धसका!...रक्तसाठ्याची कमी रुग्णांच्या जिवावर तर बेतणार नाही नं?

blood donate.jpg
blood donate.jpg

नाशिक : (पिंपळगाव बसवंत) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्तपेढ्यांना शिबिरे घेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या रक्तपेढ्यांमध्ये आणीबाणीची परिस्थिती दिसून येत आहे. रक्तदात्यांनी कोरोनाचा धसका घेतल्याने रक्तदानाच्या श्रेष्ठ कर्तव्यापासून ते दूर जात आहेत. 

रुग्णांच्या जिवावर बेतण्याची भीती

अपघात, प्रसूतीसाठी नाशिक जिल्ह्याला रोज सुमारे 250 रक्तपिशव्यांची गरज असते. मागणीच्या तुलनेत अवघे 25 टक्के म्हणजे 50 ते 70 पिशव्या पुरविल्या जात आहेत. रक्तपिशव्यांच्या टंचाईने अनेकांचा श्‍वास कायमचा रोखला जाण्याची भीती आहे. त्यासाठी रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन रक्तपेढींकडून केले जात आहे. अपरिचित व्यक्तीचे प्राण वाचविण्याच्या उद्देशाने पुण्यकर्म समजल्या जाणाऱ्या रक्तदानावरही कोरोनाचा परिणाम झाला आहे. शिबिरे घेण्यास बंदी असल्याने रक्तपेढ्या हतबल झाल्या आहेत. त्यामुळे अचानक रक्तपिशव्यांची आवक थांबली आहे. अपघात, महिलांच्या प्रसूतींचे प्रमाण कमी न झाल्याने रक्ताची मागणी नाशिक जिल्ह्यातील सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये रोज सरासरी 250 पिशव्यांची आहे. रक्त संकलन होत नसल्याने व मागणीपेक्षा पुरवठा कमी झाल्याने रक्ताची नितांत गरज असणाऱ्या रुग्णांच्या जिवावर बेतण्याची भीती आहे. प्रामुख्याने निगेटिव्ह रक्तगटांच्या रक्तपिशव्या दुर्मिळ झाल्या आहेत. 

रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यावरच रक्तपेढी व रुग्णांची मदार

रक्तपेढ्यांमध्ये नित्याने रक्ताचा पुरवठा होणे आवश्‍यक आहे. रक्तदानानंतर 35 दिवसांच्या आत ते रुग्णापर्यंत पोचविणे गरजेचे असते. अन्यथा ते कालबाह्य होते. शिबिरे होत नसल्याने स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी येणाऱ्या रक्तदात्यावरच रक्तपेढी व रुग्णांची मदार आहे. नाशिक शहरातील आघाडीच्या रक्तपेढ्यांमध्ये स्वयंस्फूर्तीने रोज 15 ते 20 रक्तदाते येत असायचे. आता कोरोनाचा धसका घेतल्याने आता चार ते पाच रक्तपिशव्यांचे संकलन होत आहे. 

रक्तदान कुणाचे प्राण वाचवू शकते? 

रक्तपिशव्यांचा तुटवडा निर्माण होण्याची चिंताजनक परिस्थिती आहे. जिल्ह्यात रोज 250 व्यक्ती रक्तावाचून तडफडत आहेत. त्यात आपले नातलग, मित्र असू शकतात. त्यांना जीवनदान देण्यासाठी रक्तदानाचा श्रेष्ठ धर्म नागरिकांनी निभवायला हवा. आपले रक्तदान कुणाचे तरी प्राण वाचवू शकतात, या उद्दात्त भावनेने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तपेढीत जाण्याची गरज आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com