नाशिककरांना लवकरच स्वस्तात गॅस! सतरा हजार पाइपलाइन जोडणी पूर्ण 

gas connections.
gas connections.

नाशिक : शहरात घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडे (एमएनजीएल) २५ हजार गॅसजोडणीसाठी नोंदणी झाली असून, आतापर्यंत ‘एमएनजीएल’ने १७ हजार घरांपर्यंत गॅसजोडणी पूर्ण केली आहे. तीन ते चार महिन्यांत जोडणी झालेल्या घरांना पाइपच्या माध्यमातून स्वस्तात गॅस उपलब्ध होणार आहे. 

शहराची स्मार्ट शहराकडे वाटचाल होत असताना, नाशिकमध्ये स्मार्ट प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यातीलच घरोघरी सिलिंडरऐवजी पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करण्याची योजना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीतर्फे अमलात आणली जात आहे. नॅचरल गॅससाठी एमएनजीएल कंपनीने आडगाव ट्रक टर्मिनल, मालेगाव स्टँड, पाथर्डी फाटा, विल्होळी नाका या चार स्टेशनसाठी महापालिकेकडून १५ वर्षांसाठी जागेचा करार केला आहे. येथे सीएनजी युनिट, रिफलिंग केले जाईल. गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्याचे काम ‘एमएनजीएल’मार्फत सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात दीडशे किलोमीटरची पाइपलाइन टाकली जाणार आहे. रस्ते खोदण्यासाठी महापालिकेकडे तोडफोड फी (डॅमेज चार्जेस) अदा केले आहे. 

२५ हजार ग्राहकांची नोंदणी 

नाशिकसह धुळे शहरात पाइपलाइनद्वारे नॅचरल गॅस (पीएनजी) पुरवठा केला जाणार आहे. नाशिक शहरात आतापर्यंत २५ हजार ग्राहकांनी पाइपलाइन गॅससाठी मागणी नोंदविली आहे. त्यातील १७ हजार घरांपर्यंत गॅस पाइपलाइन जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. हायप्रेशर, मीडियम प्रेशर व लो प्रेशर पाइपलाइनचे काम प्रगतिपथावर आहे. दसक, आडगाव, पाथर्डी, पळसे, दोडी बुद्रुक, पिंपळगाव बसवंत, ओझर, इगतपुरी येथे सीएनजी पंप तयार केले असून, जून २०२१ पर्यंत नाशिक शहरात ३० सीएनजी स्टेशन उभारले जाणार आहेत. सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून चारचाकी, रिक्षा, नव्याने सुरू होणाऱ्या शहर बस तसेच औद्योगिक वापरासाठी कॉम्पॅक्ट नॅचरल गॅस (सीएनजी) उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘एमएनजीएल’चे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव यांनी दिली. 

असे होईल खोदकाम 

शहरात पाइपलाइनद्वारे गॅसपुरवठा करताना पहिल्या टप्प्यात २५ किलोमीटरचे रस्ते खोदून पाइपलाइन टाकली जाईल. सिडकोतील पाथर्डी फाटा सर्कल येथे ९२३ मीटर, आनंदनगर पाच हजार २०८ मीटर, ज्ञानेश्वरनगर पाच हजार ६८९, पाथर्डी रस्त्यावरील पांडवनगरी येथे तीन हजार १२८ मीटर, इंदिरानगर भागात चार हजार ३४३, तर सातपूर भागात सेरेन मेडाजमधील सात हजार १२० मीटर याप्रमाणे खोदकाम केले जात आहे. 

पीएनजीसाठी वाढती मागणी 

नागरिकांच्या घरापर्यंत थेट गॅस पाइपलाइन पोचणार असल्याने घरोघरी सिलिंडर पोचविण्याची पद्धत कालांतराने बंद होणार आहे. पाणीमीटरप्रमाणे वापरानुसार गॅस वापराचे बिलिंग होईल. गॅस सिलिंडरसाठी वारंवार नंबर लावण्यापासून सुटका मिळेल. एलपीजी गॅसपेक्षा ४० टक्क्यांनी किंमत कमी होईल. पीएनजी गॅस स्फोटक नसल्याने धोका कमी, तर २४ तास गॅस उपलब्ध होणार आहे. 
 

शहरात सतरा हजार पीएनजी गॅस जोडणीचे काम पूर्ण झाले असून, एकूण २५ हजार ग्राहकांनी नोंदणी केली आहे. सीएनजी स्टेशनची उभारणी जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार आहे. 
-संदीप श्रीवास्तव, प्रकल्प अधिकारी, एमएनजीएल, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com