अरुणदादांचा आधार आणि कोरोनाग्रस्तांना अश्रू अनावर; माणुसकीचं दुर्मिळ उदाहरण

संतोष विंचू
Sunday, 27 September 2020

अडीअडचणीला मोठ्या भावाप्रमाणे म्हणून मदत मिळाल्यावर जेव्हा हे संकट टळते, तेव्हा आभार मानताना नक्कीच डोळ्यातून अश्रू अनावर होतात, असा अनुभव येवलेकरांनी घेतलाय तो अरुण चव्हाण यांच्या सेवाभावी कार्यातून... 

नाशिक : (येवला) तुमच्या घरात ही व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे; पण घाबरू नका, आम्ही व्यवस्थितपणे उपचार करतोय. तुम्ही त्रास होत असेल, तर तपासणी करून घ्या, या गोळ्याही घ्या, एकमेकांच्या संपर्कात राहू नका आणि कधीही मदत लागली, तर मला फोन करा...असे वाक्य शहरातील कोरोनाग्रस्तांच्या अनेक कुटुंबीयांनी अनुभवले आहे. अडीअडचणीला मोठ्या भावाप्रमाणे म्हणून मदत मिळाल्यावर जेव्हा हे संकट टळते, तेव्हा आभार मानताना नक्कीच डोळ्यातून अश्रू अनावर होतात, असा अनुभव येवलेकरांनी घेतलाय तो अरुण चव्हाण यांच्या सेवाभावी कार्यातून... 

मानसिक आधार देऊन आरोग्य सेवेची जबाबदारी

आनंदाचे अनेक भागीदार असतात; पण दुःखात मात्र सोबती मिळणेही कठीण...हा अनुभव कोरोनाच्या महामारीत अनेक जणांनी घेतलाय. मात्र येथील ग्रामीण रुग्णालयातील अरुण चव्हाण नावाचे हे व्यक्तिमत्त्व मात्र स्वतःहून कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी पुढे येत आहे. ग्रामीण रुग्णालयात वरिष्ठ औषधनिर्माण अधिकारी या पदावर कार्यरत असल्याने त्यांनी औषधांच्या वितरणाच्या जबाबदारी बरोबर स्वत:लाही कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांच्या सेवेत वाहून घेतले आहे. कोरोनाने विळखा घातलेल्या कुटुंबीयांच्या जवळ शेजारीपाजारी, तर सोडा नातलगही जवळ येत नाही...अशा स्थितीत अरुणदादा या कुटुंबीयांना मानसिक आधार देऊन आरोग्य सेवेची जबाबदारी घेत आहे. 

होतेय कामाची प्रशंसा

बाभूळगाव येथील कोरोना केंद्रावर स्वॅब घेणे, त्यासाठी पाठपुरावा करणे, रुग्णाच्या जेवणाची सोय करणे ही कामे तर ते करतातच; पण इतर वेळेत रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची विचारपूस करणे, त्यांना मानसिक आधार देणे, त्यांच्या मनातील भीती दूर करणे आणि गरज असल्यास त्यांना घरी जाऊन गोळ्या-औषध उपलब्ध करून देणे ही सर्व कामे श्री. चव्हाण आपले जोडीदार अनिल शिरसाठ यांच्या मदतीने करत आहेत. श्री. चव्हाण यांनी केलेल्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनीदेखील त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

१५ ऑगस्टला शासकीय सोहळ्यात प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे यांच्या हस्ते उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल त्यांचा गौरव झाला. सोशल मीडिया फोरमतर्फे एमव्ही कलेक्शन येथे त्यांचा गौरव झाला. काही अडीअडचण आली किंवा काही मदत हवी असेल, तर फक्त फोन करण्याचा उशीर की अरुण चव्हाण हजर...आपल्या परीने जी होईल ती मदत देण्यास तत्पर, या मदतीमुळे कित्येक लोकांचे प्राण वाचवण्यात या सेवकाला यश आले आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to the corona patients due to the support of Arun Dada nashik marathi news