समाधानकारक पावसामुळे बहरली भात शेती! शेतकऱ्यांमध्ये समाधान

गोपाळ शिंदे
Wednesday, 30 September 2020

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसरात कृषी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध भाताचे वाण विकसित करण्यात आले आहे. यामध्ये गरी-कोळपी, सोनम, इंद्रायणी, आंबेमोहर, जीर, झिल्ली, डामरागा डोंगर, कोलम,1008 आदि वाणांची पिके जोमदारपणे वाऱ्याच्या जोरावर डोलायला लागली आहे.

नाशिक / घोटी : तालुक्यात समाधाकारक पाउस पडल्याने भात पिके जागोजागी जोमाने बहरल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. तर काही भागात करपा व तुडतुड्या रोगाने थैमान घातल्याने शेतकरी चिंतातूर दिसत आहे.

भात विकास प्रकल्प राबवावा

तांदळाचे कोठार म्हणून जिल्ह्यात प्रसिध्द असलेल्या तालुक्यात ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांच्या धर्तीवर शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भात विकास प्रकल्प राबवण्यात यावा यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना फायदा होईल अशी मागणी शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांनी केली आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर परिसरात कृषी प्रशिक्षणाच्या माध्यमातून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध भाताचे वाण विकसित करण्यात आले आहे. यामध्ये गरी-कोळपी, सोनम, इंद्रायणी, आंबेमोहर, जीर, झिल्ली, डामरागा डोंगर, कोलम,1008 आदि वाणांची पिके जोमदारपणे वाऱ्याच्या जोरावर डोलायला लागली आहे.

भात पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव

इगतपुरी तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात भात लावणी दरम्यान पावसाने ओढ दिल्याने लेट लावणी करण्यात आली, यामुळे या पट्ट्यातील पिके अजून कमजोर स्थितीत असून अजून पावसाची गरज आहे. तर मध्य व पश्चिम पट्ट्यातील भात पिके हि जोमदार आहे. बागायती क्षेत्रातील पिकांवर करपा-तुडतुडे आदी प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट निर्माण होणार आहे. त्र्यंबकेश्वर हरसूल पट्ट्यात जोमदार पिके पाहायला मिळत असले जरी अंजेनेरी, पेगलवाडी, काही परिसरातील भात पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

भात विकास प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत निश्चित स्वरुपाचे उत्पादन वाढ आणि कृषि क्षेत्रातील गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करणे असा आहे. कृषि उत्पादनात वाढ करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचा हा प्रकल्प हा लाभदायी ठरेल यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. – डॉ. संजय शेवाळे,गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी विभाग नाशिक.

 भूसंपादनाने दिवसांगणिक भात क्षेत्र कमी होत आहे. यामुळे उत्पादनात घट होत आहे. इतर जिल्ह्यांच्या धर्तीवर इगतपुरी-त्र्यंबक झोनमध्ये भात विकास प्रकल्प राबविण्यात यावा. यातून शेतकऱ्यांना उपयुक्त बियाणांपासून ते विक्री पर्यंतच्या सर्व शेतीसामुग्रीस सहकार्य मिळाल्यास अधिक फायदा होईल. - नितीन चोरडिया उद्योजक, राईस अॅन्ड भगर मिल.
 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rice cultivation flourished due to satisfactory rainfall nashik marathi news