"शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न

सोमनाथ कोकरे
Tuesday, 8 December 2020

कुंपणाच्या भिंतीच्या आडोशाला तीन दगडांची चुल करून त्यावर सकाळ-सायंकाळ छोट्या कुकरमध्ये डाळ व भात शिजतो. त्यावरच गुजराण...  फुटपाथवरचा कागद व कचरा हेच सरपण. काळा झालेला कुकर शेजारीच उभा असलेला कृत्रिम पाय  लक्ष वेधतो, त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे हे चित्र पाहून दहा-पाच रुपये देतात. त्याचेच तांदूळ व डाळ आणली जाते.

नाशिक : टिळक रस्त्यावरीळ चार चाकी वाहनांच पार्किंग आणि यशवंत व्यायाम शाळेची कुंपणाची भिंत, त्याच्या आडोशाला तरुण दाम्पत्य राहत आहे. त्यातील महिला दिव्यांग आहे. उजवा पाय गुडघ्यापासून  नाहीच. त्यांना दोन वर्षांचा चिमुकला मुलगाही आहे.त्याच्या अंगावरही फारसे कपडे नाही.

कोरोना व लॉकडाऊनमुळे मुंबईतील नोकरी गेली, अन् त्याचा संसार खरोखरच रस्त्यावर आला. रुग्णवाहिकेवर ड्रायव्हरची नोकरी करीत होता. नियतीचे चक्र फिरले पण फुटपाथवर राहत असलेल्या या दाम्पत्याची जिद्द मात्र दांडगी आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास आहे.

कुंपणाच्या भिंतीच्या आडोशाला तीन दगडांची चुल करून त्यावर सकाळ-सायंकाळ छोट्या कुकरमध्ये डाळ व भात शिजतो. त्यावरच गुजराण...  फुटपाथवरचा कागद व कचरा हेच सरपण. काळा झालेला कुकर शेजारीच उभा असलेला कृत्रिम पाय लक्ष वेधतो, त्यामुळे रस्त्याने येणारे जाणारे हे चित्र पाहून दहा-पाच रुपये देतात. त्यातूनच तांदूळ व डाळ आणली जाते.

हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा

फुटपाथवर भिंतीच्या कडेला मांडलेला हा संसार,पाण्यासाठी तीन चार बाटल्या, धुराने काळा झालेला कुकर, चहा बनविण्यासाठी पातेलं, दोन तीन मळलेल्या गोधड्या अन् तुटलेल्या उजव्या पायासाठी कृत्रिम पाय.. बस्स एवढचं संसाराचं साहित्य... कित्येक दिवस झाले भाकरीचा चंद्रही त्यांना पाहायला मिळाला नाही. असा हा बजरंग आणि दिव्यांग लक्ष्मीचा संसार...!.

बजरंग सांगत होता, "गोदा काठावर राहण्यासाठी जागा पाहायला गेलो. पण तेथे गंजडी, भामटे, भिकारी व घाणेरडे धंदे पाहून परत आलो, आपण ड्रायव्हर असल्याने पार्किंग केलेल्या गाड्यांमध्येच चूल मांडलीय".बजरंग हा मध्यप्रदेशातल्या शुक्ल, ब्राम्हण कुटुंबातला, कॉन्व्हेंटमध्ये दहावी पर्यंत शिकलेला, नोकरीच्या शोधात बेंगलोरहून मुंबईमध्ये आला.
लक्ष्मी मात्र इयत्ता पहिलीच शिकलेली, यांची पहिली भेट मुंबईमध्येे पडली, बजरंग यूपीचा तर। लक्ष्मी पेठ-हरसुलची. लक्ष्मीचा पाय रेल्वे अपघातात आधीच तुटलेला होता तरी बजरंगने तिच्याशी कोर्ट मॅरेज केलं. खूप चांगल्या मुली लग्नासाठी आल्या. पण दिव्यांग लक्ष्मीवरच प्रेम व सहानुभूतीमुळेे नाकारल्या, अस बजरंग सांगत होता. त्यांना एक अपत्य झालं.. त्याच नाव 'शिव'.

दिव्यांग लक्ष्मीच्या छातीला गाठ आल्याने ती झोपूनच आहे, आजार वाढल्याने परवा सिव्हिल हॉस्पिटल नेलं, तपासणीसाठी तिथल्या डॉक्टरांनी होते तेवढे  रुपये घेतले, मात्र लक्ष्मीचा आजार बरा नाही झाला. तिला आता तापही येतोय. बसवत नाही तरी कसाबसा भात शिजवते.

हेही वाचा- अखेर बेपत्ता शेतमजूराचा शोध लागला; पण धक्कादायक दृश्याने गावात खळबळ

आज एक इनोव्हा कार आली त्यातील भल्या माणसण हे सर्व पाहिलं चौकशी केली. बजरंग ड्रायव्हर आहे हे कळल्यावर त्याची कागदपत्रे पहिली, तीन बँकांची एटीएम कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड. त्यांनी नोकरी द्यायचं कबूल केलंय, घरी नेल्यावर लक्ष्मीचा औषधोपचारही करू म्हटलेत पण अद्याप ते आले नाहीत, त्यांची वाट बजरंग व लक्ष्मी पाहत आहेत. चार पाच महिन्यापासून फोन रिचार्ज नसल्याने संपर्कही बंद झालाय.पुन्हा लवकरच ड्रायव्हरची नोकरी मिळेल,  रस्त्यावरच जगणं संपेल, राहण्यासाठी चांगल्या घरात जाऊ, लक्ष्मीला औषधोपचार करू, शिव जरा मोठा झाला की त्यालाही कॉन्व्हेंटमध्ये टाकू, त्याला डॉक्टर किंवा इंजिनियर नक्कीच करणार आहे,


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roadside living couple struggling nashik marathi news