धावपटूंना अद्यापही "मिशन बिगिन अगेन''ची प्रतीक्षाच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी नावलौकिक मिळविला आहे. ही गौरवशाली परंपरा कायम राहण्यासाठी खेळाडूंचा भरपूर सराव होणे आवश्‍यक आहे. एकीकडे सामान्य जनजीवन सुरळीत होत असताना, खेळाडूंना सरावाची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे

नाशिक : लॉकडाउननंतर आता जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली असून, येत्या रविवार (ता. 28)पासून जिम सुरू करण्याचा निर्णयही जाहीर झाला आहे. मात्र, धावपटूंना अद्याप "मिशन बिगिन अगेन'ची प्रतीक्षा कायम आहे. सप्टेंबरपासून विविध स्पर्धा सुरू होत असताना, या पार्श्‍वभूमीवर सराव महत्त्वाचा असल्याचे धावपटूंचे म्हणणे आहे. 

खेळाडूंचा भरपूर सराव होणे आवश्‍यक

लॉकडाउनपासून धावपटूंचा सराव थांबला आहे. त्यामुळे एरवी सकाळी व सायंकाळी धावपटूंनी फुल झालेली मैदाने काही महिन्यांपासून ओस पडली आहेत. असे असताना आहार व व्यायामात बहुतांश खेळाडूंनी सातत्य राखले होते. मात्र, धावण्याचा सराव करताना अनेक अडचणी येत असल्याने अपेक्षित सराव झालेला नाही. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नाशिकच्या धावपटूंनी नावलौकिक मिळविला आहे. ही गौरवशाली परंपरा कायम राहण्यासाठी खेळाडूंचा भरपूर सराव होणे आवश्‍यक आहे. एकीकडे सामान्य जनजीवन सुरळीत होत असताना, खेळाडूंना सरावाची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. 

दीडशे धावपटूंचा सिंथेटिक ट्रॅकवर सराव 

ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडियाने धावपटूंना सरावासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार विभागीय क्रीडासंकुलातील सिंथेटिक ट्रॅकवर प्रत्येक खेळाडूने आठ मीटरचे अंतर ठेवूनही सराव केला, तरी सुमारे दीडशे धावपटू एकावेळी सराव करू शकतील, अशी स्थिती आहे. 

स्पर्धांचे संभाव्य वेळापत्रक 

सप्टेंबरमध्ये स्पर्धांना सुरवात होत असून, ऍथलेटिक्‍स फेडरेशन ऑफ इंडियाने वेळापत्रक जाहीर केले आहे. 12 सप्टेंबरला राष्ट्रीय स्पर्धा पतियाळा (पंजाब) येथे नियोजित आहे. 60 वी राष्ट्रीय खुल्या गटाची ऍथलेटिक्‍स अजिंक्‍यपद स्पर्धा 20 सप्टेंबरपासून चेन्नई (तमिळनाडू) येथे नियोजित आहे. ऑक्‍टोबरच्या प्रारंभी 24 वी फेडरेशन कप राष्ट्रीय वरिष्ठ गट ऍथलेटिक्‍स चॅंपियनशिप पतियाळा येथे नियोजित आहे. 

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पतियाळाच्या धर्तीवर विविध ठिकाणी किमान राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना सरावाची संधी मिळणे आवश्‍यक आहे. सप्टेंबरपासून होणाऱ्या स्पर्धांच्या तयारीसाठी सराव महत्त्वाचा ठरेल. सर्व काही सुरळीत करण्यात प्रशासनाने प्रचंड मेहनत घेतली असून, खेळाडूंच्या दृष्टीनेही सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. - विजेंद्र सिंग, "साई'चे प्रशिक्षक 

हेही वाचा > आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Runners are also waiting for this mission now nashik marathi news