काय सांगता! महागाईच्या काळातही १७ रुपयास किलोभर साबण? ग्राहकांचीही पसंती

kala saban.jpg
kala saban.jpg

मालेगाव (नाशिक) : दाट लोकवस्तीच्या मालेगावात किलोने मिळणारा काळा साबण ३५ वर्षांपासून लोकप्रिय आहे. विशेषत: शहराच्या मुस्लिमबहुल भागातील ग्राहक कपडे धुण्यासाठी त्याचा प्रामुख्याने वापर करतात. येथे साबण बनविण्याचे डझनभर कारखाने असून, महिन्याला १२० टनापर्यंत उत्पन्न घेतले जाते. यामुळे एकट्या मालेगाव तालुक्यात महिन्याकाठी शंभर टन काळ्या साबणाची विक्री होते. तर उर्वरित साबण मुंबई, भिवंडी, औरंगाबाद, जळगाव, येवला, नगर आदी ठिकाणी विक्रीसाठी पाठविला जातो. 

साबणविक्री करणाऱ्या शहरात शेकडो हातगाड्या 

महागाईच्या युगातही साबणाचे भाव स्थिर असून, अवघ्या १७ रुपयाला किलोभर साबण मिळत आहे. या व्यवसायातून हजारो कामगारांना रोजगार मिळततो. या साबणाची निर्मिती १९८० मध्ये मुंबईत झाली. १९८५ मध्ये मालेगावात दोन कारखान्यांमध्ये साबण बनविण्यास सुरवात झाली. मागणी वाढत गेल्याने उत्पादनही वाढले. तीन दशकांत कारखान्यांची संख्या बारावर पोचली. महिन्याला एका कारखान्यात दहा टन साबण तयार केला जातो. कोरोना काळात तेजी-मंदीचे सावट असल्याने उत्पादन कमी-अधिक होते. सरासरी महिन्याला १२० टनापर्यंत उत्पादन घेतले जाते. यातील निम्मा माल शहरातच विकला जातो. येथील झोपडपट्टीत, तर ९५ टक्के घरात कपड्यांसाठी काळा साबण वापराला जातो. किरकोळ व्यावसायिक कारखान्यातून माल घेऊन तो हातगाडीवर विकतात. साबणविक्री करणाऱ्या शहरात शेकडो हातगाड्या आहेत. याशिवाय किराणा दुकानातही तो मिळतो. 

मालेगावच्या साबणाला इतरांचीही स्पर्धा 

शहरातील १३२ झोपडपट्ट्यांमध्ये हजारो कुटुंबीय राहतात. दारिद्र्यरेषेखालील या नागरिकांना हा साबण सहज परवडतो. त्यामुळे गेली ३५ वर्षे त्याची लोकप्रियता टिकून आहे. झोपडपट्टीबरोबरच शहर व परिसरातील अनेक सामान्य व मध्यमवर्गीय कुटुंबीयदेखील हा साबण वापरतात. काळ्या साबणाचा झोपडपट्टीत राहणारा ग्राहक हक्काचा झाला आहे. कपड्यांसाठी तसेच भांडी धुण्यासाठी तो वापरला जातो. स्थानिक साबणाबरोबरच धुळे, जळगाव, अमरावती, सेंधवा येथे तयार होणारा काळा साबणदेखील मालेगावात विक्री होतो. स्पर्धेच्या युगात बाजारात मिळणारे विविध नामवंत कंपन्यांचे साबण महागडे असल्याने सामान्य कुटुंबीय काळ्या साबणाच्या प्रेमात पडले आहेत. 

कोरोनामुळे भाव स्थिर 

कोरोनामुळे इतर व्यवसायांसारखा फटका काळ्या साबणालाही बसला. बाहेरगावी माल जात नसल्याने उत्पादन घटले. परिणामी दर स्थिर ठेवावे लागले. येथील एका कुटुंबाला साधारणत: आठवड्याला दोन किलो साबण लागतो. कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात येत आहे. येथील बहुतांश कारखान्यांतून उत्पादन सुरू असले तरी ते माफक आहे. मालेगावचे अर्थचक्र यंत्रमागाच्या खडखडाटावर अवलंबून आहे. सध्याच्या परिस्थितीत हा खडखडाट काहीसा मंदावला आहे. यंत्रमागाने उभारी घेतल्यास साबणासह इतर व्यवसायदेखील बहरतील. 

कोरोनामुळे व्यवसायावर परिणाम झाला. मालाला हवी तशी मागणी नाही. कमी दरात माल विकावा लागत आहे. यामुळे कारखानदारांना नुकसान सहन करावे लागत आहे. - अबुबकर चौधरी, कारखानदार, मालेगाव 

इतर साबणांच्या तुलनेने काळा साबण स्वस्त आहे. आमच्यासारख्या मोठ्या कुटुंबीयांना तो परवडतो. तीस वर्षांपासून कपडे धुण्यासाठी या साबणाचा वापर करतो. - मुमताज शेख, गृहिणी, मालेगाव  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com