दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा; स्मार्ट प्रकल्पांबाबत शिवसेनेची आयुक्तांकडे तक्रार 

विक्रांत मते
Friday, 16 October 2020

स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचा मनमानी कारभार आदींबाबत तक्रारींचे निवेदन आयुक्त कैलास जाधव यांना देताना प्रकल्प वेळेत पूर्ण करावे, वाताहत झालेल्या प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी बोरस्ते यांच्यासह महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी केली

नाशिक : चार वर्षांपासून शहरात सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांची वाताहत झाली असून, योजना वेळेवर मार्गी लावण्याबरोबरच कंपनीच्या सावळ्या गोंधळाची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली. 

स्मार्टसिटी अंतर्गत शहरात चारशे कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. परंतु एकही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे व ऑप्टिकल फायबरसंदर्भात तक्रारी आहेत. स्मार्ट सायकलिंग प्रकल्प गुंडाळण्यात आला. स्मार्ट स्ट्रीट लाइट प्रकल्प अद्यापही अपूर्ण आहे. स्मार्ट पार्किंग चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने यातून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार भविष्यात होणार आहेत. पायलट स्मार्ट रोड प्रकल्प राबविला. परंतु ठेकेदाराला परस्पर दंड माफ करण्यात आला. रस्त्याच्या कामात अद्यापही अनेक त्रुटी कायम आहेत. अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसविण्याचे काम अद्यापही पूर्ण होत नाही. गोदावरी सौंदर्यीकरण, सोलर प्रकल्प, कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम अद्यापही कागदावरच आहेत. गावठाण विकासअंतर्गत रस्ते तयार करण्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे.

हेही वाचा > दुर्दैवी! अस्मानी संकट, निसर्गाचा कहर आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांचा मनमानी कारभार आदींबाबत तक्रारींचे निवेदन आयुक्त कैलास जाधव यांना देताना प्रकल्प वेळेत पूर्ण करावे, वाताहत झालेल्या प्रकल्पांची चौकशी करण्याची मागणी बोरस्ते यांच्यासह महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांनी केली. तक्रारींची दखल न घेतल्यास नगरविकासमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देण्यात आला. 

हेही वाचा > "कलेक्टरसाहेब, शहर-जिल्ह्यातील अवैध धंदे थांबवा!" पोलिस आयुक्तांचे तिन्ही विभागांना पत्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena demands action against guilty officials nashik marathi news