shivsena aggressive take on manmad-kopargaon road toll
shivsena aggressive take on manmad-kopargaon road toll

या मार्गावर खड्ड्यांची दुरुस्ती न करताच होतेय टोलवसुली; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

येवला : मालेगाव-मनमाड-येवला-कोपरगाव या अत्यंत वर्दळीच्या मार्गावरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष झाल्याने आजपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर टोलवसुली जोरात सुरू असूनही टोल प्रशासनाकडून दुरुस्तीकडे कानाडोळा करत असल्याने येवला ते मनमाडदरम्यान रस्ता दुरुस्त करावा व तोपर्यंत टोलवसुली थांबवावी, या मागणीसाठी आता शिवसेना आक्रमक झाली असून, याप्रश्‍नी येवला पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.याप्रकरणी प्रांताधिकारी सोपान कासार यांना निवेदन देण्यात आले. 

टोल प्रशासनाकडून अनेक नियम धाब्यावर 
मालेगाव, मनमाड, येवला, कोपरगाव हा रस्ता इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला बीओटी तत्त्वावर दिला आहे. येवल्याजवळ या मार्गावर टोलवसुलीही जोरात सुरू आहे. टोल प्रशासनाने अनेक नियम धाब्यावर बसवले असून, अटी-शर्तीना फाटा दिला आहे. २०१० पासून कंपनीने खड्डे बुजवण्याव्यतिरिक्त रस्त्याच्या सुधारणेची कोणतीही ठोस कामे केलेली नाहीत. त्यामुळे गेल्या मागील काही महिन्यांत या रस्त्यावर येवला- मनमाड मार्गावर १७ ते १८ अपघातांची नोंद झाली आहे.

जनव्यापी धरणे आंदोलन करण्याचा इशारा​

दोन दिवसांपूर्वी अनकाई शिवारात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकासह त्यांच्या नातेचा बळी गेला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे, असे असूनही टोल व्यवस्थापनाकडून दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याप्रश्‍नी १६ ऑगस्टला सकाळी दहाला सावरगाव (येवला) चौफुलीवर जनव्यापी धरणे आंदोलन करण्याचा इशारा संभाजी पवार यांनी दिला आहे. रस्त्याची सुधारणा होत नाही, तोपर्यंत कोणतीही टोलवसुली करण्यात येऊ नये तसेच रस्त्याची सुधारणा होत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, सदस्य मंगेश भगत, विठ्ठल आठशेरे, जिल्हा दूध संघ संचालक शरद लहरे, बापूसाहेब गायकवाड, संग्राम मेंगाळ आदी उपस्थित होते.

मनमाड-कोपरगाव मार्गावर ‘बीओटी’ची वसुली होताना दुरुस्तीचे नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. संपूर्ण रस्ता खड्ड्यात जाऊन अपघात वाढून वाहनचालकांचे जीव जात आहेत. जनसामान्यांच्या हितासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. 
-संभाजी पवार, माजी सभापती, येवला 

रिपोर्ट - संतोष विंचू

संपादन - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com