
लॉकडाउन शिथिल होताच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत शस्त्रक्रिया सुरू झाल्या. मात्र, शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुरेशी व्यवस्था नसतानाही बोलावून वेठीस ठेवले.
नाशिक : कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनदा मातांच्या जिवाशीच खेळ करत वेठीस धरल्याचा प्रकार शिरसगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला आहे.
एकाच दिवशी ४२ मातांवर शस्त्रक्रिया?
शिरसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दहा बेड उपलब्ध आहेत. या ठिकाणी कुटुंबनियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकाच दिवशी ४२ मातांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना बेड, ब्लँकेट, पिण्यासाठी पाणी यासह इतर कुठल्याही प्रकारची सुविधा केंद्राकडून पुरविण्यात आलेली नाही. शस्त्रक्रियेनंतर या सर्व मातांना थेट एका खोलीत ठेवत सर्वांना खाली झोपण्यास भाग पाडण्यात आले. ऐन थंडीच्या काळात महिलांना पुरेशी व्यवस्था नसल्याने रात्र थंडीत काढण्याची वेळ आली. या वेळी सर्व परिस्थितीची माहिती स्थानिकांनी जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांना कळविली. यानंतर माळेकर यांनी तत्काळ रात्री अकरानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिली असता, त्यांना सर्व महिला जमिनीवर अंथरूण टाकून झोपल्याचे दिसले.
गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस
यातील अनेकांकडून पुरसे कपडेदेखील नसल्याचे कळताच त्यांनी विनायक माळेकर, समाधान बोडके, मिथुन राऊत, हिरामण गावित, राहुल शार्दुल आदींच्या मदतीने सर्व मातांना तत्काळ ब्लँकेट, खाण्यासाठी बिस्किट, पाण्याची व्यवस्था करून दिली. यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्याधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे याबाबत विचारणा करत जाब मागितला. मात्र, यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. कोरोनामुळे कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडाउन शिथिल होताच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांत शस्त्रक्रिया सुरू झाल्या. मात्र, शासनाने दिलेल्या नियमांना डावलून शिरसगाव, ठाणापाडा आरोग्य केंद्रांवर स्तनदा मातांना कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी पुरेशी व्यवस्था नसतानाही बोलावून वेठीस ठेवले.
चौकशी करत दोषींवर कारवाईची मागणी
त्र्यंबकेश्वर तालुक्यात नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी एकच वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहे. वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया करून गेल्यानंतर रुग्णांना चार दिवस निगराणीत ठेवण्यात येते. मात्र, या वेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या सर्वांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून आले. या प्रकरणी रूपांजली माळेकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना निवेदन दिले.
हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना
शिरसगाव व ठाणापाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नसबंदी करण्यासाठी क्षमतेपेक्षा जास्त मातांना आणून त्यांच्या जिवाशी खेळ खेळला गेला. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नादात स्तनदा मातांची हेळसांड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. - रूपांजली माळेकर, जिल्हा परिषद सदस्या
हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा