कोविडचा आलेख समजण्यासाठी ‘सिरो टेस्ट’; ठराविक पॉकेट्समधून घेणार रक्तचाचणी 

विक्रांत मते
Wednesday, 9 December 2020

संबंधित व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही याची माहिती मिळेल. हर्ड इम्युनिटी विकसित होण्याचे प्रमाण कमी असल्यास कोरोना, त्याप्रमाणे संसर्गाचा सामना करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे

नाशिक : शहरात कोरोनाची दुसरी लाट आली किंवा येईल याबाबत खात्री करून घेण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात सिरो टेस्ट केली जाणार आहे. यात ठराविक पॉकेट्समधील नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जातील. त्यातून संबंधित व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही याची माहिती मिळेल. हर्ड इम्युनिटी विकसित होण्याचे प्रमाण कमी असल्यास कोरोना, त्याप्रमाणे संसर्गाचा सामना करण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. \

महापालिकेचा निर्णय; ठराविक पॉकेट्समधून घेणार रक्तचाचणी 

एप्रिलमध्ये शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली. मेअखेरपासून कोरोनाचा आलेख उंचावला. सप्टेंबरमध्ये विक्रमी रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत शहरात ६८ हजार १६६ जणांना कोरोनाची लागण झाली, तर ९२१ लोक मृत्युमुखी पडले. रुग्णांची संख्या वाढली तरी बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण यात अधिक आहे. आतापर्यंत घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजार ३४७ आहे. सध्या एक हजार ८९८ रुग्ण उपचार घेत आहेत. हिवाळ्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासनाच्या आरोग्य विभागाने वर्तविली.

हेही वाचा - ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता

दिवाळीत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडल्याने रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता दिसून येत असताना उपचाराची दिशा ठरविण्यासाठी आता सिरो टेस्टचा आधार घेतला जाणार आहे. सिरो टेस्ट म्हणजे रक्ताच्या नमुन्यातून संबंधित व्यक्तीला कोरोना झाला किंवा नाही याची माहिती मिळेल. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्याच्यात कोरोनाचे प्रतिजैविक तयार झाली असे समजले जाते. परंतु २० लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या नाशिक शहरात सर्वच नागरिकांचे रक्तनमुने तपासण्यास घेणे शक्य नाही. त्यामुळे ठराविक भागातील नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहेत. त्यासाठीचा अभ्यास अहवाल महापालिकेचा वैद्यकीय विभाग तयार करत असून, साधारण पाच ते सहा हजार नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेतले जातील. 

हेही वाचा - जन्मतः अंध घुबडाची श्रुती बनली "आई-बाबा"! कोरोना काळातील एक अनोखी कथा अन् प्रेमही​

या भागात ‘सिरो टेस्ट' 
निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यापूर्वी एक्झिट पोल जाहीर होतात. त्याच धर्तीवर सिरो टेस्ट संकल्पना आहे. लोकसंख्येची घनता असलेला कोरोनाची अधिक लागण झाली तो भाग, व्यापारी पेठ, सरकारी कार्यालये, झोपडपट्टी भाग, हाय प्रोफाइल सोसायटी आदी ठराविक भागातील नागरिकांच्या रक्तनमुन्यांची तपासणी करून कोरोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही याची तपासणी होईल. प्रतिजैविक (ॲन्टिबॉडीज) अधिक लोकांमध्ये तयार झाल्या असतील तर कोरोना संसर्गाला सहज आळा बसू शकेल किंवा कमी लोकांमध्ये प्रतिजैविके तयार झाली असतील तर महापालिकेला अधिक उपाययोजना करण्याची आवश्‍यकता राहणार असल्याचा निष्कर्ष त्यातून निघू शकेल. 

वीस लाख लोकसंख्येच्या शहरात किती लोकांमध्ये कोरोना प्रतिजैविके तयार झाली असतील याची माहिती सिरो टेस्टच्या माध्यमातून समोर येईल. या संदर्भात सरकारी महाविद्यालयांशी बोलणे सुरू आहे. -डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siro test to understand Corona virus graph nashik marathi news