‘क्रेडाई’तर्फे कामगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण - रवी महाजन

विक्रांत मते
Saturday, 3 October 2020

कामगारांची माहिती शासनाच्या श्रम विभागाकडे पाठविली जाणार आहे. पाठपुरावा करण्यासाठी ‘क्रेडाई’तर्फे लेबर वेल्फेअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, सहसचिव अनिल आहेर व नरेंद्र कुलकर्णी समितीचे कामकाज बघणार आहेत.

नाशिक : बांधकाम दर्जामध्ये कामगारांचा मोठा वाटा असतो, या कामगारांच्या कलेला कौशल्याची साथ मिळाल्यास अधिक दर्जेदार वास्तू उभ्या राहतात, त्याचमुळे ‘क्रेडाई’च्या माध्यमातून सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून कामगारांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे प्रतिपादन क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष रवी महाजन यांनी केले. 

प्रशस्तिपत्रक व विद्यावेतन दिले जाणार

क्रेडाईच्या वतीने बांधकामांवरील तीस कारागिरांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणाचा प्रारंभ गुरुवारी (ता. १) शहा असोसिएटस येथे झाला. राष्ट्रीय क्रेडाईचे सल्लागार जितूभाई ठक्कर यांच्या हस्ते उपक्रमाचे उदघाटन झाले. ‘क्रेडाई’चे सचिव गौरव ठक्कर, सचिन बागड, सुशील बागड, हंसराज देशमुख, विजय चव्हाणके, राजेश आहेर, अनंत ठाकरे, सागर शहा, मनोज खिंवसरा, अतुल शिंदे, नितीन पाटील, संदीप कुयटे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष महाजन म्हणाले, की कारागिरांना प्लास्टरिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिफिकेशन, सेंट्रींग अशा व अनेक बाबींचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण बांधकामाच्या साईटसवर दिले जाणार आहे. उपक्रमांतर्गत क्रेडाई सभासदांच्या विविध बांधकाम साईटवर काम करणाऱ्या कामगारांना एका महिन्याचे प्रशिक्षण तज्ज्ञांकडून दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय क्रेडाई तर्फे प्रशस्तिपत्रक व विद्यावेतन दिले जाणार आहे. 

हेही वाचा >  तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!

कामगारांना आर्थिक लाभ 

प्रशिक्षणासोबतच कामगारांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली जाणार असून, कामगारांना आर्थिक लाभ मिळणार आहे. कामगारांची माहिती शासनाच्या श्रम विभागाकडे पाठविली जाणार आहे. पाठपुरावा करण्यासाठी ‘क्रेडाई’तर्फे लेबर वेल्फेअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, सहसचिव अनिल आहेर व नरेंद्र कुलकर्णी समितीचे कामकाज बघणार आहेत. पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक अकाउंटसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. कामगारांना झीरो बॅलन्स अकाउंट उघडता यावे, यासाठी क्रेडाई महाराष्ट्र तर्फे इंडियन पोस्ट बँक सोबत करार करण्यात आल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.  

हेही वाचा > लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Skill development training by CREDAI nashik marathi news