नगरसेविकेचे 'स्मार्ट वर्कआउट'! व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक

योगेश बच्छाव
Thursday, 3 September 2020

एक हजाराहून अधिक नागरिक या ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. प्रभागातील पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे ही सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

नाशिक : (सोयगाव) कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना सामूहिकरीत्या एकत्र येण्यावर बंधने आहेत. याशिवाय स्वच्छतेला अधिकाधिक महत्त्व दिले जात आहे. अशा परिस्थितीत आपल्या प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेसह काही समस्या असतील तर त्यांनी त्या थेट आपल्या मोबाईलमधील ग्रुपवर अपलोड केल्यानंतर अवघ्या काही तासांत नागरिकांच्या समस्या सोडविण्याला सोयगावातील प्रभाग दहामध्ये सुरुवात झाली आहे. 

प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप

नगरसेविका आशा आहिरे यांनी नागरिकांसाठी मोबाईलवर ग्रुप तयार करीत स्मार्ट वर्कआउट सुरू केले आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या सुटत असल्याने शहरातील प्रत्येक प्रभागात असे स्मार्ट वर्कआउट केले गेले पाहिजे, अशी अपेक्षा मालेगावकरांनी व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा वापर करून नगरसेविका आहिरे यांनी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करत चांगला उपक्रम हाती घेतला आहे. ग्रुपच्या माध्यमातून नागरिक आपल्याला परिसरातील समस्या ग्रुपवर टाकत त्या नगरसेविका आहिरे यांच्या माध्यमातून सोडविल्या जात आहेत. सोडियम दिवे, रस्ते, पाणी आदी समस्या या माध्यमातून सोडविल्या जात आहेत. एक हजाराहून अधिक नागरिक या ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. प्रभागातील पावसाच्या पाण्याचा निचरा न होणे ही सर्वांत मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! सासरच्यांनीच लेकीचा घातपात करुन विहिरीत फेकल्याचा पित्याचा आरोप; परिसरात खळबळ

गेल्या अनेक दिवसांपासून प्रभागातील नागरिक फोन करून आपल्या समस्या मांडत होते. मात्र प्रभाग क्रमांक १० नावाचे पाच ग्रुप तयार करत प्रभागातील बहुतांश समस्या या ग्रुपवर नागरिक टाकतात. त्यामुळे ज्या त्या भागातील समस्या समजण्यास व त्या सोडविण्यास मदत होते. - आशा आहिरे, नगरसेविका 

गेल्या चार महिन्यांपासून आमच्या कॉलनीतील सोडियम दिवे बंद अवस्थेत होते. प्रभाग क्रमांक १० या ग्रुपवर मी फोटो काढून समस्या टाकली. दुसऱ्याच दिवशी नगरसेविका आशा आहिरे यांनी दखल घेत दिवे सुरू केले. ग्रुपच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी मदत होत आहे. - सरला बच्छाव, रहिवासी 

आनंदसागर हाउसिंग सोसायटीमागे बँक कॉलनीत नागरिकांना पावसाच्या पाण्यामुळे वाट काढणे जिकिरीचे झाले होते. या भागातील फोटो काढून प्रभाग १० या ग्रुपवर टाकले. नगरसेविका आहिरे यांनी तत्काळ दखल घेत या भागात मुरूम टाकत नागरिकांना वाट मोकळी करून दिली. - दर्शन लोणारी, रहिवासी  

हेही वाचा > गाई चारायला गेलेल्या प्रशांतच्या नशिबी असे दुर्दैव; घटनेनंतर गावात भयाण शांतता

संपादन - किशोरी वाघ

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Smart workout by corporator, Troubleshoot through WhatsApp group nashik marathi news