esakal | काय सांगता! समाजमंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका आता कोविड सेंटर? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

samaj temple

महापालिकेच्या स्वमालकीच्या मिळकतींचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्याचा पर्याय समोर येत आहे. नागरिकांना त्या-त्या भागातच क्वारंटाइन करून उपचार करण्याचे नियोजन सुरू आहे. या माध्यमातून महापालिकेच्या मिळकतींचा खऱ्या अर्थाने वापर होण्यासह वादात सापडलेल्या मिळकतींचाही वापर होणार आहे.

काय सांगता! समाजमंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका आता कोविड सेंटर? वाचा सविस्तर

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना उपचारासाठी पायाभूत सुविधा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. आतापर्यंत सामाजिक संस्थांच्या मदतीवर अवलंबून असलेल्या महापालिकेने कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या स्वमालकीच्या मिळकतींचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्याचा पर्याय समोर येत आहे. नागरिकांना त्या-त्या भागातच क्वारंटाइन करून उपचार करण्याचे नियोजन सुरू आहे. या माध्यमातून महापालिकेच्या मिळकतींचा खऱ्या अर्थाने वापर होण्यासह वादात सापडलेल्या मिळकतींचाही वापर होणार आहे.

महापालिकेचे नियोजन सुरू; त्या भागातच क्वारंटाइन करून रुग्णांवर उपचार

महापालिकची समाजमंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिकांची संख्या एक हजार ३१९ च्यावर पोचली आहे. महापालिकेच्या एका सर्वेक्षणात या मिळकतींचा फायदा तात्पुरती मालकी असलेल्या नगरसेवक किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनाच अधिक झाल्याचे दिसून आले. शासनाने महापालिकेच्या मिळकतींसंदर्भात धोरण आखताना त्या मिळकतींवर रेडीरेकनरच्या ८ टक्के दराने भाडेआकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेडीरेकनरच्या अडीच टक्के दराने आकारणी झालेल्या मिळकतींची संख्या जेमतेम ४९ इतकीच आहे. नाममात्र दराने दिलेल्या मिळकती अद्यापही १९५ असून, २१७ मिळकतींची भाडेआकारणीच झालेली नाही. संधीशुल्क दिलेल्या मिळकती २२, तर अंगणवाडी म्हणून वापर होत असलेल्या मिळकतींची संख्या ७५ इतकी आहे. धार्मिक कामांसाठी ५९, स्थानिक नागरिक विनामूल्य वापरत असलेल्या मिळकती १६९, विनाकरार वापरात असलेल्या मिळकती सात, बंद असलेल्या मिळकती आठ, तर महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मिळकतींची संख्या १४४ आहे. 

समाजमंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका आता कोविड सेंटर
मोकळ्या भूखंडावर १५ टक्क्‍यांपेक्षा अधिक बांधकाम झालेल्या ३६ मिळकतींची चौकशी सुरू आहे. नियमाप्रमाणे महापालिकेच्या मिळकतींचा वापर सार्वजनिक कामांसाठीच होणे अपेक्षित असते. परंतु सार्वजनिक कमी खासगी कामांसाठीच या इमारतींचा वापर अधिक झाला आहे. विशेष म्हणजे वीज, पाणीदेयके महापालिकेने अदा करण्याबरोबरच देखभाल व दुरुस्तीही महापालिकेकडूनच होत असल्याने फुकटच्या इमारतींवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.

कोरोनानिमित्ताने वापराला संधी
उच्च न्यायालयाने दिलेल्या तंबीनंतर महापालिकेने शहरात समाजमंदिरे, व्यायामशाळा, अभ्यासिका असे ३७४ मिळकती सील केल्या. त्या मिळकतींचा वापर कोविड सेंटर म्हणून शक्य आहे. २१७ मिळकतींवर भाडेआकारणीच झालेली नाही. त्या मिळकतीही कोविड सेंटर म्हणून वापरात आणणे शक्य होणार आहे. विनावापर असलेल्या १७७ मिळकतीही ताब्यात घेता येणार आहेत. सात मिळकती विनाकरार असल्याने त्या ताब्यात घेता येतील. १४४ मिळकती पूर्वीपासून महापालिकेच्या ताब्यात आहेत.

तर ९ हजार १९० खाटांची व्यवस्था
महापालिकेने समाजमंदिरे, व्यायामशाळा किंवा अभ्यासिका ताब्यात घेऊन तेथे कोविड सेंटर उभारल्यास त्यातून सुमारे नऊ हजार १९० खाटांची व्यवस्था निर्माण होऊ शकते. एका मिळकतीमध्ये कमीत कमी पाच, तर अधिकाधिक दहा खाटा बसू शकतील. याच्या निम्म्या खाटांची व्यवस्था केली तरी किमान पाच हजार खाटांची व्यवस्था असलेले सेंटर निर्माण होईल. याचा आणखी एक फायदा म्हणजे ज्या भागात मिळकत आहे, त्याच भागातील नागरिकांना तेथे क्वारंटाइन करून उपचार करता येतील.

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे