"वाण घेण्यासाठी जा आणि कोरोनाचे शिकार व्हा"! सासूरवाडी व बाजारपेठेला जावईबापूंची प्रतिक्षा

युनूस शेख
Monday, 28 September 2020

वाण घेण्यासाठी जा आणि कोरोनाचे शिकार व्हा, अशी भीती जणू जावईबापूंना वाटत असावी. त्यामुळे त्यानी यंदाच्या अधिकमासात सासूरवाडीस जाण्यास टाळले आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे बाजाराला जावईबापूंची प्रतीक्षा आहे. 

नाशिक : वाण घेण्यासाठी जा आणि कोरोनाचे शिकार व्हा, अशी भीती जणू जावईबापूंना वाटत असावी. त्यामुळे त्यानी यंदाच्या अधिकमासात सासूरवाडीस जाण्यास टाळले आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर झाला आहे. त्यामुळे बाजाराला जावईबापूंची प्रतीक्षा आहे. 

जावईबापूंची प्रतीक्षा 
अधिकमासात जावईबापू तसेच लेक नातवडांसह सासरी येत असते. त्यांचा चांगल्या प्रकारे पाहुणचार होत असतो. शिवाय वाणाच्या स्वरूपात त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू, नवीन कपडे दिले जातात. त्यानिमित्त मुलगी, नातवडांसाठीही नवीन कपडे खरेदी केले जात असल्याने बाजारपेठ नागरिकांनी फुलून जाते. मेन रोड, शालिमार, दहीपूल भागात तर पाय ठेवण्यास जागा नसते. त्यात रविवार असेल, तर गर्दीत अजूनही भर पडत असते. यंदा मात्र सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. कुठल्या व्यक्तीपासून लागण होऊ शकते, हे कुणी सांगू शकत नाही. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे. यास महत्त्व दिले जात आहे. शिवाय प्रवास करणेही टाळले जात आहे. त्यामुळे शहराच्या बाहेर वास्तव्यास असलेले जावईबापू सासरी जाणे टाळत आहे. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

बाजार सुना सुना 
जर मुलगी, नातवंडे, जावईबापू येणार नसेल तर खरेदी कोणासाठी करायची, असा विचारच नागरिकांनी केला की काय, असे वाटते. रविवार असूनही आज बाजारपेठ ओस दिसून आली. अतिशय तुरळक नागरिक बाजारपेठेत दिसले. शनिवार, रविवार बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. शिवाय महिनाअखेरचाही परिणाम खरेदीवर झाला आहे. लॉकडाउननंतर बाजारपेठ तसी कोमेजलेलीच आहे. धोंड्याचा महिना असल्याने तरी बहर येईल, असे व्यावसायिकांना वाटत होते. मात्र त्यांचीही निराशा झाली आहे. सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या दुकानांमध्ये एखाद दोन खरेदीदार दिसत आहे. त्यामुळे भांडे खरेदी, कापड खरेदीसह सगळ्याच बाजाराला खरेदीदारांची प्रतीक्षा आहे.  

हेही वाचा >  तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son in law avoided going to wife home nashik marathi news