जिल्हाधिकारी म्हणताएत...'कोरोनामुक्‍त जिल्ह्यासाठी हवी सर्वांची साथ'

suraj mandhare.jpg
suraj mandhare.jpg
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील अवघ्या चार तालुक्‍यांत कोरोनाचा फैलाव झाल्याचे दिसते. उर्वरित ऐंशी टक्‍के जिल्हा कोरोनामुक्‍त आहे. त्यामुळे सोमवार (ता.20)पासून शासनाच्या दिशानिर्देशांनुसार दैनंदिन व्यवहारात शिथिलता येईल. परंतु, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य बाबींचे काटेकोर पालन केल्यावरच जिल्हा कोरोनामुक्‍त होऊ शकेल. त्यामुळे सर्वांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

पोलिस बंदोबस्तामुळे बाहेरील व्यक्‍तींना मज्जाव

एखाद्या परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन जाहीर केला जाईल व अशा ठिकाणी सवलती मिळणार नाहीत. आपल्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होईल, असे वर्तन कुणीही करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. श्री. मांढरे म्हणाले, की 28 मार्चपर्यंत जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. त्यानंतर मात्र आपण कोरोनाशी सातत्याने लढा देत आहोत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सत्तरहून अधिक झाली असून, मालेगावमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. मालेगावला सुरवातीला पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांशी संबंधितांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करत समाजापासून दूर ठेवल्याने फैलाव झाला नाही. यापुढेदेखील उच्च धोका असलेल्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले जाईल. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी मालेगावला इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर सुरू केले असून, आयएएस दर्जाचे अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच मालेगावच्या बाह्य सीमेवरील पोलिस बंदोबस्तामुळे बाहेरील व्यक्‍तींना मज्जाव केला जात आहे. केवळ अत्यावश्‍यक वस्तूंचे दळणवळण या तालुक्‍यात सुरू आहे. 

सावधगिरी आवश्‍यकच 

सर्व प्रकारच्या बंधनांचे पालन करून शेतीची कामे, उद्योगव्यवसायात काम करायचे आहे. विविध विभागांमार्फत सहाय्यता क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय पोलिस विभागाकडून परवानग्या दिल्या जाणार आहेत. कामगार, शेतमजूर आदी घटकांना संबंधित विभागांकडून पास देण्याची व्यवस्था केली आहे. सध्या जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याने सूचनांचे व्यवस्थित पालन केल्यास कोरोनाच्या संकटातून आपण सुखरूपपणे बाहेर पडू, असेही त्यांनी नमूद केले. पहिला रुग्ण बरा झाला असून, दुसरा रुग्णही बरा होण्याच्या प्रक्रियेत आहे. हळूहळू सर्व रुग्ण बरे होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. याउलट नागरिकांनी सावधगिरी बाळगली नाही, तर कंटेन्मेंट झोन वाढतील. अशा परिसरांमध्ये बंधने येतील, याची जाणीव ठेवावी. आतापर्यंत उत्तम साथ दिल्याबद्दल आभार मानतानाच यापुढेही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.  

झोनची संकल्पना आरोग्य विभागासाठी 

रेड, ऑरेंज, ग्रीन असे वेगवेगळे झोन करण्यात आले आहेत. "लॉकडाउन' काळात दैनंदिन कामकाजाविषयीच्या सवलतींचा या झोनशी काहीही संबंध नाही. केवळ आरोग्य विभागाने धोरण ठरविण्यासाठी ही रचना केली आहे. उद्योगधंदे, शेती प्रक्रियेच्या प्रणालीचा या झोनशी काहीही संबंध नसल्याचे श्री. मांढरे यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com