नाशिक ते बेळगाव अवघ्या तासाभरात; स्टार एअरची २५ जानेवारीपासून सेवा सुरु

महेंद्र महाजन
Wednesday, 20 January 2021

कंपनीचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत एकरनाळ, मनीष रावल उपस्थित होते. हेसी म्हणाले, की बेळगाव हे देशातील पहिले खासगी ‘एअरोस्पेस एसईझेड' आहे. नाशिककरांना या विमानसेवेमुळे आता उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर), दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी) तसेच गोवा या ठिकाणी प्रवास करणे सोईचे होईल.

नाशिक : नाशिक ते बेळगाव हे अंतर ५८० किलोमीटर असून हा प्रवास १२ तासांचा आहे. २५ जानेवारीपासून मात्र संजय घोडावत समूहाच्या बेंगळुरुस्थित स्टार एअर कंपनीची नाशिक-बेळगाव विनाथांबा विमानसेवा सुरु होत असून एक तासात नाशिकहून बेळगावमध्ये पोचता येईल. सोमवार, शुक्रवार, रविवारी विमानाचे सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी बेळगावमधून, तर नाशिकच्या ओझर विमानतळावरुन सायंकाळी सव्वासहाला उड्डाण होईल. 

२४ जानेवारीपर्यंत १ हजार २०२ रुपयांच्या भाड्याची सवलत

स्टार एअर कंपनीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त ‘उडाण' योजनेतंर्गत विमानसेवा सुरु होत असल्याने २४ जानेवारीपर्यंत १ हजार २०२ रुपयांच्या भाड्याची सवलत देण्यात आली आहे. १ फेब्रुवारी ते २४ ऑगस्टपर्यंत नाशिक ते बेळगाव विमानाचे भाडे १ हजार ९९९ रुपये असे राहील. पन्नास आसन क्षमता असेल. विमानसेवा शुभारंभावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, मीग कॉम्प्लेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशगिरी राव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव हे उपस्थित राहतील. कंपनीचे विपणनचे प्रमुख राज हेसी यांनी ही माहिती आज येथील पत्रकार परिषदेत दिली. 

दीड तासाच्या अंतरावर कोल्हापूर, गोवा

कंपनीचे विभागीय व्यवस्थापक शशिकांत एकरनाळ, मनीष रावल उपस्थित होते. हेसी म्हणाले, की बेळगाव हे देशातील पहिले खासगी ‘एअरोस्पेस एसईझेड' आहे. नाशिककरांना या विमानसेवेमुळे आता उत्तर कर्नाटक (बेळगाव, हुबळी, धारवाड, विजापूर), दक्षिण महाराष्ट्र (कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी) तसेच गोवा या ठिकाणी प्रवास करणे सोईचे होईल. बेळगावपासून दीड तासाच्या अंतरावर कोल्हापूर आणि गोवा आहे. याशिवाय विमानसेवेमुळे बेळगाव आणि परिसरातील जिल्ह्यातून भाविकांना महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी नाशिक व शिर्डीला येणे सुलभ होईल. 

लवकरच जोधपूर-जामनगरला विमानसेवा 

हेसी म्हणाले, की संजय घोडावत हे व्यावसायिक पालयट आहेत. त्यांच्या समूहातील स्टार एअर ही कंपनी अद्ययावत इम्बरेर ईआरजे १४५ या विमानांचा वापर करते. इम्बरेर या कंपनीची विमाने आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित म्हणून जगभरात ओळखली जातात. स्टार एअर सध्या अहमदाबाद, अजमेर (किशनगड), बेळगाव, बेंगळुरू, दिल्ली (हिंडन), हुबळी, तिरुपती, इंदूर, कलबुर्गी, मुंबई आणि सुरतसह दहाहून अधिक भारतीय शहरांना सेवा पुरवते. दिवसाला २२ विमाने प्रवाश्‍यांना घेऊन उड्डाण करतात. याशिवाय लवकरच जोधपूर व जामनगर विमानसेवाही सुरू होणार आहे. कंपनीच्या विमानसेवेला जोडलेले नाशिक हे बारावे शहर आहे. संजय घोडावत समूह हा विमानसेवा, शिक्षण, ग्राहक उत्पादने, खाद्यपदार्थ, अपारंपारिक ऊर्जा, उत्खनन, वस्त्रोद्योग, सॉफ्टवेअर, रिटेल अशा अनेक उद्योगांमध्ये गेल्या २५ वर्षांपासून आहे. समूहात दहा हजार मनुष्यबळ कार्यरत आहे. 

हेही वाचा > पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

'आरसीएस-उडाण' अंतर्गत देशातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरांना जोडणार असल्याचा आम्हाला आनंद होत आहे. प्रवाशांकडून मिळणारा प्रचंड प्रतिसाद आम्हाला नेहमी प्रोत्साहन देत असतो. अब्जावधी डॉलर्सच्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पासाठी नाशिक महत्त्वाचे असल्याने नाशिकहून उड्डाण सेवा सुरू करण्यासाठी आम्ही खरोखर उत्सुक आहोत. त्यामुळे औद्योगिक उपक्रमांना मदत होईल. - संजय घोडावत (समूहाचे अध्यक्ष) 

स्टार एअर कंपनी देशातील दोन प्रमुख शहरांना जोडणार असल्याची घोषणा करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यामुळे प्रादेशिक ‘कनेक्टिव्हिटी‘ वाढेल आणि दोन्ही राज्यातील व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल. - श्रेणीक घोडावत (स्टार एअरचे संचालक) 

हेही वाचा > चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Star Airs Nashik to Belgaum Airlines from January 25 nashik marathi news