''न्यायालयात काय होईल ते होईल, आपल्या लोकांना वाचविणे गरजेचे'' - छत्रपती संभाजीराजे भोसले

दत्ता जाधव
Saturday, 26 September 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती, त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने युवकांसाठी घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर हे आंदोलन भरकटू नये, म्हणून शनिवारी (ता. २६) नाशिकला राज्यस्तरीय बैठक पार पडली. नाशिकच्या औरंगाबाद रोडवरील मधुरम हॉलमध्ये होणाऱ्या बैठकीत खासदार संभाजीराजे भोसले यांनी मार्गदर्शन केले. 

नाशिक : (पंचवटी) 'आरक्षणाचा निकाल काहीही लागो, न्यायालयात काय होईल ते होईल. परंतु आपल्या लोकांना वाचविणे गरजेचे आहे. ते शक्य न झाल्यास छत्रपतींचा वारसा सांगण्याची माझी लायकी नाही, असे मी समजेल.' असे प्रतिपादन छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले यांनी शनिवारी (ता. 26) रोजी केले. 

बैठकीपूर्वी राज्य शासनाच्या आठ निर्णयांची होळी

सर्वोच्च न्यायालयाने मराठी आरक्षणाला स्थगिती दिल्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी औरंगाबाद रोडवरील मधुरम बॅक्वेंट हॉलमध्ये शनिवारी (ता. 26) दुपारी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला समाजाचे राज्यभरातील समन्यवयक उपस्थित होते. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीच्या सुरुवातीलाच राज्य सरकारने समाजाप्रती केलेल्या आठ घोषणांच्या पत्रकांची होळी करण्यात आली. यावेळी एक मराठा- लाख मराठा, जय जिजाऊ- जय शिवराय, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय आदी घोषणांनी परिसर दणानून गेला होता. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर विश्‍वविक्रमी तलवारीचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या जिल्हा समन्वयांनी आपले विचार व्यक्त केल्यावर छत्रपती संभाजी भोसले यांनी मार्गदर्शनातून उपस्थितांना आश्‍वस्त केले. 

...तर छत्रपतींचा वारसा सांगणार नाही

बैठकीत मार्गदर्शन करताना खा. भोसले यांनी मी संभाजी बोलत नसून छत्रपतींचा वंशज बोलत असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजी मॅनेज झाल्याची आवई उठविण्यात येते, परंतु अडचणीत सापडलेल्या आपल्या लोकांना वाचविण्याला आपली प्रथम पसंती असल्याचे सांगून राजेंनी तसे न झाल्यास आपली छत्रपती होण्याची लायकीच नसल्याचे सांगितले. यावेळी नरेंद्र पाटील, सुनील बागूल यांच्यासह राज्यभरातून आलेल्या समन्वयांनी आपली भुमिका विषद केली. 

हेही वाचा > तीन दिवसांपासून शोधाशोध; आणि तपास लागला १५० फूट खोल गाळात!

यावेळी बैठकीला खासदार हेमंत गोडसे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, श्रीमंत यशराजे भोसले, नाशिक पूर्वचे आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, माजी आमदार नितीन भोसले, सुनील बागूल, तुषार जगताप, करण गायकर, गणेश कदम, ॲड. शिवाजी शहाणे, अमृता पवार, नाना महाले, वत्सला खैरे, अर्जुन टिळे यांच्यासह राज्यभरातून आलेले समन्वयक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A statewide meeting was held in Nashik in the presence of MP Sambhaji Raje nashik marathi news