इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा थांबवा! शिवसेनेचे अन्न व औषध विभागाला निवेदन

अंबादास शिंदे
Wednesday, 23 September 2020

शहरात कोविड रुग्णांचे प्रमाण वाढले असून, रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. उपचारासाठी रेमेडेसिव्हर व ॲक्टेमरा या दोन इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज आहे.

नाशिक रोड : नाशिक शहरात कोविड रुग्णावर उपचारांसाठी आवश्यक रेमेडेसिव्हर व ॲक्टेमरा या इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा भासून काळ्या बाजारात होणारी विक्री थांबवावी, या आशयाचे निवेदन शिवसेनेतर्फे अन्न व औषधे प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार यांना देण्यात आले. 

शहरात कोविड रुग्णांचे प्रमाण वाढले असून, रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. उपचारासाठी रेमेडेसिव्हर व ॲक्टेमरा या दोन इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. परंतु कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांकडेच या दोन्ही औषधांची कमतरता असल्याचे दिसत आहे. या औषधांसाठी रुग्णालये नातेवाईकांकडे मागणी करीत आहे. शहरात ही दोन्ही औषधे सहजतेने नागरिकांना उपलब्ध होत नाही. काही ठराविक औषधे विक्रेत्यांकडे ठराविक किमतीपेक्षा जादा किंमत घेतली जात आहे. यामुळे नातेवाईकांना आर्थिक भुर्दंडांला सामोरे जावे लागत आहे. मध्यंतरी आपल्या विभागामार्फत या औषधांचा तुटवडा नसल्याचे प्रसिद्ध करून शहरातील काही औषध एजन्सीची नावे प्रसिध्द करण्यात आली. त्या ठिकाणी ही औषधे मिळतील असे जाहीर करण्यात आले होते. मात्र अनेक नागरिकांना या ठिकाणी औषधे मिळाले नसल्याच्या तक्रारी आहेत. औषधांचा काळा बाजार करणाऱ्या विक्रेत्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी. औषधे सुलभतेने व योग्य किमतीत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनात केली. निवेदनावर नगरसेवक प्रशांत दिवे, सुनील गोडसे, रोशन आढाव, राकेश जाधव, अनिकेत गांगुर्डे आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा > गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Stop the artificial shortage of injections nashik marathi news