गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज; कुटुंबीयांची मदतीची याचना 

अंबादास शिंदे
Tuesday, 22 September 2020

आई-वडिलांचा एकुलता मुलगा पत्नी व मुलासह राहतो. अज्ञात प्रवाशांनी त्याला अहमदाबादला सोडण्याची गळ घातली. लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद होता. भाडे मिळाल्याने जय लग्नाचा वाढदिवस असूनही तयार झाला. पण त्यानंतर जयसोबत घडलेल्या घटनेने त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यचं बदललं आहे.

नाशिक रोड : आई-वडिलांचा एकुलता मुलगा पत्नी व मुलासह राहतो. अज्ञात प्रवाशांनी त्याला अहमदाबादला सोडण्याची गळ घातली. लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद होता. भाडे मिळाल्याने जय लग्नाचा वाढदिवस असूनही तयार झाला. पण त्यानंतर जयसोबत घडलेल्या घटनेने त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाचं आयुष्यचं बदललं आहे.

गुजरातमध्ये गोळ्या लागलेल्या जयची मृत्यूशी झुंज 
जेल रोडच्या लोखंडे मळ्यात जय सोमनाथ डगळे (वय ३२) आई-वडिलांचा एकुलता मुलगा पत्नी व मुलासह राहतो. मागील मंगळवारी (ता. १५) अज्ञात प्रवाशांनी त्याला अहमदाबादला सोडण्याची गळ घातली. लॉकडाउनमध्ये व्यवसाय बंद होता. भाडे मिळाल्याने जय लग्नाचा वाढदिवस असूनही तयार झाला. जत्रा चौकातून दोन प्रवाशांना घेऊन तो गुजरातला निघाला. बलसाडला पोचल्यानंतर वघईच्या नॅशनल पार्कच्या जंगलात दोन्ही प्रवाशांनी लघुशंकेसाठी गाडी थांबवून त्याच्या मानेत दोन गोळ्या झाडल्या. त्याला फेकून गाडीसह फरारी झाले. नंतर गाडी वणी-सापुतारा रस्त्यावर सोडून दिली. रक्ताच्या थारोळ्यातील जयला गुजरात पोलिसांनी वासदा रुग्णालयात व नंतर बलसाड जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

लूट नव्हे फक्त हल्ला 
किचकट ऑपरेशनची सुविधा नसल्याने धोका पत्करून कुटुंबीयांनी जयला नाशिकला आणले. या जंगलात अशाच पद्धतीने सहा चालकांना लुटल्याचे रहिवाशांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात जयची सोनसाखळी, अंगठ्या, पैसे चोरट्यांनी लुटले नाही, तसेच गाडीही सोडून दिली. जयने बदली चालक देतो, असे सांगूनही हल्लेखोरांनी त्यालाच येण्याचा आग्रह धरला. त्यामुळे कुटुंबीयांना घातपाताचा संशय आहे. गुजरात पोलिस जयच्या जबानीसाठी आठ दिवसांपासून नाशिकमध्येच आहेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

ऑपरेशनसह उपचारासाठी मोठा खर्च

कर्जाने कार घेऊन ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करणाऱ्या जेल रोड येथील युवकांवर दोन प्रवाशांनी गुजरातमध्ये गेल्यावर मानेत पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. युवकाची गंगापूर रोडवरील रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. तीन ऑपरेशनसह उपचारासाठी मोठा खर्च येणार असल्याने कुटुंब चिंतित आहे. 

 

जय शुद्धीवर आला असला तरी गोळ्या जबड्यातून मागील मेंदू, तसेच श्वासनलिकेपर्यंत गेल्यामुळे त्याला बोलता व जेवता येत नाही. नशिबानेच तो वाचला. एक ऑपरेशन झाले असून, आणखी दोन करायची आहेत. गाडीचे हप्ते व ऑपरेशनमध्येच त्याची पुंजी संपली. त्याला पैशाबरोबरच बी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे. जय अजातशत्रू असून, चांगला समाजसेवकही आहे. त्याच्या मदतीसाठी ८२०८२७५७२७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. -ज्योत्स्ना डगळे (जखमी जयची भगिनी)  
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jay is in critical condition nashik marathi news