
नाशिक : कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा यंत्रणेने पुकारलेल्या दोन दिवसांच्या लॉकडाउनला रविवारी (ता. १३) शहर व परिसरात मोठा प्रतिसाद होता. दुकानांसह बहुतांश आस्थापना बंद होत्या. मात्र त्याच वेळी शहराला लागून असलेल्या अनेक भागांत मात्र शटर अर्धवट बंद ठेवून सुरू असल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावरील वाहतूक तुरळक स्वरूपात सुरू होती. पण दुपारनंतर शहरातील रस्तेही निर्मनुष्य झाले होते. पुन्हा लॉकडाउन नको, या भावनेतून लोकच स्वयंस्फूर्तीने काळजी घेत असल्याने खऱ्या अर्थाने प्रशासनाने पुकारलेल्या बंदला शहरात प्रतिसाद दिसत होता.
कायमच वर्दळीने फुलणाऱ्या नाशिकच्या मेन रोडवर रविवारी बऱ्याच दिवसानंतर शुकशुकाट होता. महात्मा गांधी रोड, रविवार कारंजा यासह महत्त्वाच्या मार्गावर सगळीकडे दुकानदार व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. हॉटेले सुरू असली, तरी तेथे ग्राहकांचा तुटवडा होता. महापालिकेच्या मेन रोड मार्गावरील जुन्या कार्यालयाच्या परिसरात हेच चित्र होते. शहरातील सगळ्या मार्गांवर दुकानदारांनी रविवारी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, दुकाने बंद ठेवली होती. सकाळी वृत्तपत्र, दूध, नाशवंत पदार्थांची दुकाने आणि अत्यावश्यक सेवेत समावेश होणाऱ्या वस्तूंची दुकाने अपवादात्मक स्थितीत ठिकठिकाणी सुरू होती. शहरातील अशोक स्तंभ ते रविवार कारंजा परिसरातील विविध खाद्यपदार्थ वस्तूंच्या विक्रीच्या दुकानामुळे एरवी खाऊगल्लीचे रूप येणाऱ्या मार्गावर तुरळक दुकाने सुरू होती.
वाहतूक सुरळीत
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा सुरू होती. त्यामुळे ठक्कर बझार, जुने सीबीएस स्थानक यावर प्रवाशांचा थोडा राबता होता. मात्र, मोजक्या मार्गावरील बससाठी प्रवासी वाहतूक सुरू होती. दूर पल्ल्याच्या बसला अगदीच मोजकी गर्दी होती. राज्यात सगळीकडेच लॉकडाउनसारखी स्थिती असल्याने अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची बसस्थानकावर गर्दी दिसत होती. बसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेवर प्रवासी वाहतूक करण्याच्या निर्णयामुळे अतिशय शांततेत सगळे कामकाज सुरू होते. खासगी प्रवासी वाहतुकीला अत्यल्प प्रतिसाद होता.
भाजी बाजार सुरळीत
शहरात भाजी बाजार सुरू होते. सकाळी घाऊक भाजीपाला विक्रीच्या वेळेत बाजार समितीतून मालवाहतूक करण्यासाठी विक्रेत्यांची खरेदीदार भरेकरी यांची गर्दी होती. मात्र पुन्हा लॉकडाउन लागायला नको याची चिंता सगळीकडे दिसत होती. अनेक ठिकाणी रविवारी खऱ्या अर्थाने हॉटेलातही मास्क असेल तर प्रवेश या नियमाचे पालन होत होते. हॉटेल व्यावसायिक मास्कबाबत आग्रही होते. लोकांना लॉकडाउन नको आहे. त्यामुळे लोकांकडूनही प्रतिसाद मिळत असल्याचे अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकांचे म्हणणे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.