लॉकडाऊन व्यथा! 'बायकोचं मंगळसूत्र विकून काढले दिवस'...अन् अश्रूंचा फुटला बांध

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

तो रोजचा खर्च सलून व्यवसायातून भागवायचा...कोरोना आला अन् जणू आयुष्यातले ते तीन महिनेच गायब झाले. खायचं काय अन् ठेवायचं काय? मोठी विवंचनेत असतांना अखेर बायकोच्या गळ्यातील सौभाग्याच्या लेण्यावर दिवस भागवण्याची वेळ आली...हे तीन महिने आयुष्यातले सगळ्यात संघर्ष करणारे होते हे सांगतांना त्याला अश्रू अनावर झाले...

नाशिक : तो रोजचा खर्च सलून व्यवसायातून भागवायचा...कोरोना आला अन् जणू आयुष्यातले ते तीन महिनेच गायब झाले. खायचं काय अन् ठेवायचं काय? मोठी विवंचनेत असतांना अखेर बायकोच्या गळ्यातील सौभाग्याच्या लेण्यावर दिवस भागवण्याची वेळ आली...हे तीन महिने आयुष्यातले सगळ्यात संघर्ष करणारे होते हे सांगतांना त्याला अश्रू अनावर झाले...

एक एक दिवस काढणे तारेवरची कसरतच होती...

या तीन महिन्यात सुशांत सैंदाणे या सलून व्यावसायिकाने तर बायकोच्या गळ्यातील सोन्याचे मणी विकून घरखर्च भागवला. रविवार (ता. 28) पासून सलून दुकाने सुरू झाली असली तरी त्यालाही मर्यादा खूप आहेत. 
लॉकडाऊनमुळे जगायचं कसं हा मोठा निर्माण झाला. सलूनचा व्यवसाय म्हणजे दररोज जे कमावलं त्यातूनच घरखर्च भागवायचा. सुरूवातीचा पहिला महिना कसातरी भागवला. त्यानंतर मात्र घरखर्च भागवणे कठीण झाले. गेल्या तीन महिन्यांपासून दुधाचे बील थकले आहे. औषध दुकानदाराचे देणे बाकी आहे. मुलांच्या शाळेची फी कशी भरावी तसेच घराचे हप्ते कसे भरायचे याची आता चिंता सतावते आहे. आपण आपल्या प्राथमिक गरजाही भागवू शकत नाही या विवंचनेतून मात्र आपोआप नैराश्‍य यायला लागते. मध्यंतरी घरात खर्चासाठी पैसेच नसल्याने बायकोच्या मंगळसुत्रातील मणी देखील विकावे लागले, हे सांगताना सुशांतच्या डोळ्याच्या कडा आपोआप ओलावल्या. लॉकडाऊनच्या काळात एक एक दिवस काढणे म्हणजे तारेवरची कसरतच होती. 

हेही वाचा > आनंदवार्ता! जिल्ह्यातील 'हे' चार तालुके झाले कोरोनामुक्‍त...एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

इतर हप्त्यांची तजवीज करावी लागणार

लॉकडाऊन चारमध्ये काही व्यावसायिकांना सूट देण्यात आली असली तरी सलून व्यावसायिकांना मात्र परवानगी देण्यात आली नव्हती. आता ती परवानगी आजपासून देण्यात आली आहे. त्यातही फक्त कटींगच करायची. दाढी करायची नाही यासारख्या अटी ठेवल्या आहेत. दुकान सुरू करतांना ग्राहकांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्यच आहे. मात्र ते सुरक्षेचे किट घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत. त्यातही आता काहीतरी उसनवार करून किट खरेदी करून दुकान सुरू करावे लागले. लॉकडाऊनच्या काळात थकलेले दुध बिल, औषध बील, उसनवारी, मुलांची फी, इतर हप्ते यांची तजवीज आता करावी लागणार आहे. लॉकडाऊनमुळे आमच्या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले असल्याचे सुशांत सैंदाणे यांनी सांगितले. 

हेही वाचा > VIDEO : अमर रहे..वीरजवान सचिन मोरे अमर रहे..शासकीय इतमामात अंत्यसंस्कार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Struggle of barber in lockdown period nashik marathi news