VIDEO : गुड न्यूज! "आयसीएसई'च्या निकालात नाशिकचे विद्यार्थी चमकले..!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जुलै 2020

आयसीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 10) जाहीर झाला. शहरातील विविध शाळांमधून आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. बहुतांश शाळांनी शंभर टक्‍के निकालाची परंपरा कायम राखली. 

नाशिक : आयसीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 10) जाहीर झाला. शहरातील विविध शाळांमधून आयसीएसई बोर्डातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. बहुतांश शाळांनी शंभर टक्‍के निकालाची परंपरा कायम राखली. होरायझन ऍकॅडमीतील अश्लेषा शेळके हिने या परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. तिने परीक्षेतील यशाकरीता घेतलेले परीश्रम विशद करतांना, आगामी काळात परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना टिप्स्‌ दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांचा घवघवीत यश मिळवत जल्लोष
आयसीएसई बोर्डाचा निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाला असून, दहावीत 99.34 टक्के, तर बारावी परीक्षेत 96.84 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशभरात दहावीचे एकूण दोन लाख सहा हजार 525, तर बारावीचे 85 हजार 611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात दहावीचे 23 हजार 319 व बारावीचे तीन हजार 104 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिकमधील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनीदेखील घवघवीत यश मिळवत जल्लोष केला.

"होरायझन'च्या अश्‍लेषाला 98.20 टक्‍के
मविप्र संस्थेच्या होरायझन ऍकॅडमीतील आयसीएसई शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेतून अश्‍लेषा शेळके हिने 98.20 टक्के मिळवत प्रथम, तर आदित्य मुंदडा 97.80 टक्के गुणांसह द्वितीय आणि चिन्मयी मगर हिने 96.80 टक्‍क्‍यांसह तिसरा क्रमांक पटकावला आहे. सिद्धी आव्हाड व कृष्णा हेडा हे 96.60 टक्के गुणांसह संयुक्‍तरित्या चौथ्या, तर अभिजित पाटील व स्वराज देशमानकर 94.80 टक्के गुणांसह पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. एकूण 82 पैकी 28 विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळवले. 42 टक्के विद्यार्थी उत्कृष्ट श्रेणीत, तर 12 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळविले. या यशाबद्दल संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शिक्षणाधिकारी डॉ. एन. एस. पाटील, प्राचार्या डॉ. सुरेखा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

"विज्डम हाय'मधील प्रचिती, करणचे यश
विज्डमय हाय इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता दहावीचा निकाल 99 टक्के लागला आहे. प्रचिती चंद्रात्रे, करण मर्चंट या दोघांनी 99.2 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. आर्यमन दीक्षित 98.4 टक्‍क्‍यांसह द्वितीय आला. शुभदा बोराडे, प्रणय बंब, सौम्या पाटील यांनी 98.20 टक्के गुण मिळविले. दरम्यान, शाळेचा इयत्ता बारावीचा निकाल 95.75 टक्के लागला. यात वृंदा मालपाणीने 95.75 टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. तर, विक्रांत खैरनार-95.25 टक्के, वैदेही खर्डे- 94.75 टक्के, अनुष्का सावरकर- 94.50 टक्के, आशिष केवलरामनी- 92.50 टक्के यांनीही घवघवीत यश मिळविले आहे.

"अशोका'ने राखली परंपरा
अशोका युनिव्हर्सल स्कूल व अशोक जुनिअर कॉलेज यांनी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून, यंदाही शंभर टक्‍के निकाल लागला आहे. इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेतून कुनिका पटेल हिने सर्वाधिक 94.8 टक्के, गार्गी गोळेसर- 94 टक्के, तर अनुष्का बेहेरा हिने 92 टक्के गुण मिळविले. वाणिज्य शाखेतून रोशनी धनराजानी व अनिस जोयसन यांनी 94 टक्के गुणांसह संयुक्‍तरित्या प्रथम क्रमांक पटकावला. विराज बाफना याने 92.5 टक्के व ऊर्जा पारख हिने 90.8 टक्के गुण मिळविले. तसेच, इयत्ता दहावीत अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या अशोकामार्ग शाखेतील रचिता सोमाणी हिने सर्वाधिक 97.8 टक्के गुण मिळवले. सानिका बोराडे 97.6 टक्के, ऋषील सुराणा, अनिष अतेय यांनी 97.4 टक्के गुणांसह यश मिळविले. तर, चांदसी शाखेतून वेदांत कुलकर्णीने सर्वाधिक 98 टक्के गुण मिळवले. पीयूषा पटेल 97.7 टक्के, आर्यन येवले याने 96.8 टक्के गुणांसह यश मिळविले. संस्थेचे अध्यक्ष अशोक कटारिया, विश्‍वस्त आस्था कटारिया, सहसचिव श्रीकांत शुक्‍ल, प्राचार्य अमिताभ गर्ग, उपप्राचार्या रेणुका जोशी, वाणिज्य शाखेचे मुख्याध्यापक रविराज पंचाक्षरी, मुख्याध्यापिका संध्या बोराडे, मुख्याध्यापक प्रमोद त्रिपाठी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

रायनचा निकाल शंभर टक्‍के
रायन इंटरनॅशनल स्कूलचा निकाल शंभर टक्‍के लागला आहे. एकूण 196 विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले. शाळेतून रयान शेख याने 98.80 टक्‍के, तर अदिती गाडे- 97 टक्‍के, वैष्णवी ठाकूर- 96.80 टक्के, इशा कनीसघा- 96.80 टक्के, चिन्मयी व्हेळीज- 96.40 टक्‍के गुण मिळविले आहेत. एकूण 63 विद्यार्थ्यांनी नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविले आहेत. तर, 72 विद्यार्थ्यांना 80 टक्‍क्‍यांहून अधिक आणि 49 विद्यार्थ्यांना 70 टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळाले आहेत. अध्यक्ष ए. एफ. पिंटो, व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिंटो यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students got succeed in ICSC Board Exam Result Marathi News