कॅम्पस सुने सुने; नोकऱ्यांना खो! विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्लेसमेंटची आशा 

संतोष विंचू
Monday, 5 October 2020

महाविद्यालयांतील कॅम्पसद्वारे होणाऱ्या प्लेसमेंट म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळत होती..! मात्र कोरोनाने सहा महिन्यांपासून महाविद्यालयांचे कॅम्पसच ओस पाडल्याने प्लेसमेंटलाही खो बसला असून, अनेक विद्यार्थ्यांना यंदा तरी नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे.

येवला( जि.नाशिक)  : महाविद्यालयांतील कॅम्पसद्वारे होणाऱ्या प्लेसमेंट म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू असतानाच नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळत होती..! मात्र कोरोनाने सहा महिन्यांपासून महाविद्यालयांचे कॅम्पसच ओस पाडल्याने प्लेसमेंटलाही खो बसला असून, अनेक विद्यार्थ्यांना यंदा तरी नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. दर वर्षी ९० हजारांच्या आसपास होणारे प्लेसमेंट मात्र अद्यापही कागदावरच असल्याचे आकडे सांगतात. 

कॅम्पस सुने सुने; नोकऱ्यांना खो! 
पदवी किंवा पदव्युत्तर वर्गातील आणि विशेषत: तंत्रशिक्षण, अभियांत्रिकी, एमबीए, फार्मसी, डिझाइन, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट आदी शाखांतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी नामांकित कंपन्या, महाविद्यालयांमध्ये कॅम्पस मुलाखती घेऊन नोकरीसाठी प्लेसमेंट करतात. यामुळे अगदी विशीतील नव्या दमाच्या तरुणाईला गुणवत्ता हेरून त्यांना कंपनी नोकरी देते. यामुळे कॅम्पसच्या माध्यमातून प्लेसमेंट झाली, की विद्यार्थ्यांचे करिअर चांगले झालेच समजा, असेही समीकरण आहे. मार्चपर्यंत विविध कंपन्यांच्या प्लेसमेंटही या वर्षी पूर्ण झाल्या होत्या. मात्र त्यानंतर कोरोना आला आणि प्लेसमेंटला ब्रेक लागला. यात पाच-सहा महिने निघून गेले. आत्ता हळूहळू या अडथळ्यांतून बाहेर पडत विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळण्याची आशा आहे. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्लेसमेंटची आशा 
विशेषत: आताशी अनेक कंपन्यांनी ऑनलाइन टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीच्या माध्यमातून प्लेसमेंटची प्रक्रिया या महिन्यात सुरू केली आहे, पण बोटावर मोजण्याइतक्याच कंपन्यांना ही गरज पडत आहे. त्यामुळे सध्याची मंदी व शिक्षणाचे बिघडलेली घडी पाहता या तरुणांना गुणवत्ता असूनही नोकरीसाठी किती प्रतीक्षा करावी लागेल, हा प्रश्नच आहे. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

सर्वाधिक प्लेसमेंट अभियांत्रिकीत... 
महाराष्ट्रात सर्वाधिक प्लेसमेंट या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण विभागाच्या होतात. २०१८-१९ मध्ये तब्बल ६४ हजार अभियंत्यांना, तर २०१९-२० मध्ये ६१ हजार अभियंत्यांना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी मिळाली होती. त्याखालोखाल एमबीए पदवीधारकांना प्लेसमेंटमधून नोकरीची संधी मिळते. येथेही दोन वर्षांत २० व २१ हजार तरुणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. गेल्या वर्षी सर्व शाखांच्या तब्बल ९२ हजार तरुणांना प्लेसमेंटमधून नामांकित कंपन्यांना चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली. यंदा मात्र हा आकडा अजून हजाराच्या आसपास नसल्याचेही सांगितले जाते. त्यामुळे आता हळूहळू परिस्थिती बदल होत असल्याने थेट मुलाखतीतून किंवा प्लेसमेंटच्या माध्यमातून का होईना संधी मिळेल, अशी आशा आहे. 

राज्यातील प्लेसमेंटचे आकडे (सर्व शाखा) 
वर्ष - एकूण विद्यार्थी - प्लेसमेंट झालेले 

२०१६ । १७ - ४ लाख ४३ हजार - ७९ हजार ४८४ 
२०१७ । १८ - ४ लाख २० हजार - ८१ हजार १३२ 
२०१८ । १९ - ४ लाख - ९६ हजार २९३ 
२०१९ । २० - ३ लाख ८४ हजार - ९२ हजार १८३ 
२०२०। २१ - ३ लाख ९३ हजार - ------- 
 

२०१९-२० मधील सर्व मल्टिनॅशनल कंपन्यांची प्लेसमेंट प्रोसेस पूर्ण झाली होती. त्या वेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जॉइन करून घ्यायची प्रोसेस सुरू झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ऑक्टोबरमध्ये संपूर्ण निवड प्रकिया राबवत आहे. स्मॉल स्केल कंपनीसाठी मागणी होत आहे. - डॉ. नीलेश घुगे, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी, मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय, एकलहरे  

 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students hope for online placement nashik marathi news