esakal | यूरिया दीडपट असूनही शेतकऱ्यांना देताना का होतोय गोंधळ? चक्रावली यंत्रणा..! 
sakal

बोलून बातमी शोधा

uria 1.jpg

खरिपासाठी गेल्या वर्षी ३३ हजार ६६२ टन यूरिया होता. यंदा ५१ हजार १०३ टन यूरिया असूनही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना गोंधळ का होतोय, या प्रश्‍नाने यंत्रणा चक्रावली आहे. सटाण्यात सकाळपासून खत खरेदीसाठी रांगांची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली होती.

यूरिया दीडपट असूनही शेतकऱ्यांना देताना का होतोय गोंधळ? चक्रावली यंत्रणा..! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : खरिपासाठी गेल्या वर्षी ३३ हजार ६६२ टन यूरिया होता. यंदा ५१ हजार १०३ टन यूरिया असूनही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देताना गोंधळ का होतोय, या प्रश्‍नाने यंत्रणा चक्रावली आहे. सटाण्यात सकाळपासून खत खरेदीसाठी रांगांची छायाचित्रे सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. येवला, नांदगाव, बागलाण, देवळा, मालेगाव या पट्ट्यात यूरिया नसल्याने शेतकरी अस्वस्थ आहेत. 

गेल्या वर्षी ३३ हजार ६६२ अन् आता ५१ हजार १०३ टन यूरिया उपलब्ध 

कृषी विभागाने खत मिळवून सुरू केलेल्या दुकानांच्या तपासणीत ११ खत विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. सहा परवाने निलंबित करण्यात आले, तर एक परवाना रद्द करण्यात आला. बियाण्यांच्या सात आणि कीटकनाशकांच्या तीन दुकानांवर कारवाई झाली. नांदगाव आणि मनमाडला येत्या दोन दिवसांमध्ये तीन कंपन्यांचा सात हजार ६०० टन यूरिया आणून तो अधिकची मागणी असलेल्या पट्ट्यात उपलब्ध करून देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजीव पडवळ यांनी दिली. दरम्यान, खरीप २०१६ मध्ये जूनमध्ये ३२ हजार ५००, २०१७ मध्ये ३९ हजार २५६, २०१८ मध्ये ३४ हजार ७४८ टन यूरिया उपलब्ध झाला होता. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!
खतांच्या लिंकिंगकडे दुर्लक्ष का? 

नांदगाव - तालुक्यात खरीप हंगामात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, रासायनिक खतामध्ये लिंकिगचा प्रकार वाढीस लागला असून, तो थांबविला नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नीलेश चव्हाण, तालुकाध्यक्ष परशराम शिंदे, निवृत्ती खालकर, ज्ञानेश्वर निकम, समाधान व्हडगर, हेमंत चोळके, गणेश चव्हाण, दत्तात्रय महाजन, दत्तात्रय सरोदे, तेजुल बोरसे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील व तालुका पंचायत समितीचे कृषी अधिकारी चौधरी यांची भेट घेऊन त्यांना तालुक्यातील खतांच्या टंचाईबाबत लक्ष वेधत निवेदन दिले. तालुक्यात रासायनिक खतांचे लिंकिग वाढले असताना त्याकडे दुर्लक्ष का? असा सवालही पदाधिकाऱ्यांनी विचारत बनावट खते जप्त करावीत व विक्रेत्यांची गुदाम तपासावीत, अशी मागणी केली. 

हेही वाचा > ज्या मालेगावला भाजपच्या खासदारांनी नावे ठेवली.. फडणवीसांनी मात्र केले कौतुक..!
 
नांदगाव तालुक्यातील यूरिया बाहेरील तालुक्यात जाण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे नांदगाव तालुक्यात त्याची भीषण टंचाई भासत आहे. तसेच बनावट खतेही तालुक्यात आल्याची शंका आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील खत विक्रेत्यांची गुदामे तपासावीत. - नीलेश चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना) 

बागलाणला दोन दिवसांत यूरिया 
नामपूर -
 बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांना यूरिया मिळत नसल्याच्या ‘सकाळ'मधील वृत्ताची दखल घेत कृषी व पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी येथील सहकारी सोसायटीच्या खतविक्री केंद्रास भेट देऊन पाहणी केली. दोन दिवसांत खत उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिले. यंदा जूनमध्ये सुरवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. परंतु, रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून विक्रेत्यांना मागणीच्या तुलनेत अत्यल्प खतपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात खत टंचाई जाणवत आहे. शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ कृषिमंत्री दादा भुसे यांची शुक्रवारी (ता. १०) भेट घेणार असल्याचे सोसायटीचे सभापती रूपेश सावंत, डॉ. दीपकपाल गिरासे, मनसेचे शहराध्यक्ष रवी देसले यांनी सांगितले. खत विक्रीच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची दुकानांमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. पवार म्हणाले, की बागलाण तालुक्यासाठी रासायनिक कंपन्यांकडे एक हजार २०० टनांची मागणी करण्यात आली आहे. दुकानदारांची तपासणी सुरू असून, जादा दराने खतविक्री करणारे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.