जीएसटीच्या किचकट नियमांना कंटाळले कर सल्लागार! देशभरात खासदारांना निवेदन देण्याची मोहीम 

विक्रांत मते
Wednesday, 27 January 2021

जीएसटी नियमात वांरवार होणारे बदल, माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, जीएसटी फॉर्म अपलोड न होणे, ओटीपीसाठी दहा मिनिटे वाट पाहणे, या सारख्या किचकट नियमांमुळे कर सल्लागारांना मानसिक तणावाखाली वावरावे लागत आहे.

नाशिक : जीएसटी नियमात वांरवार होणारे बदल, माहिती भरताना येणाऱ्या अडचणी, जीएसटी फॉर्म अपलोड न होणे, ओटीपीसाठी दहा मिनिटे वाट पाहणे, या सारख्या किचकट नियमांमुळे कर सल्लागारांना मानसिक तणावाखाली वावरावे लागत आहे. यातून सुटका करण्याच्या मागणीसाठी देशभरात खासदारांना निवेदन दिले जात आहे. नाशिकमध्ये खासदार डॉ. भारती पवार यांना निवेदन देण्यात आले. 

देशात जीएसटी लागू होऊन साडे तीन वर्षांचा कालावधी उलटला असला तरी या कालावधीत अनेक बदल झाल्याने अनेक व्यापाऱ्यांना व कर सल्लागारांना त्याचा त्रास झाला आहे. नवीन नियम आल्यानंतर फॉर्ममध्ये ऐनवेळी बदल करावे लागतात, फॉर्म भरताना महत्त्वाची माहिती राहून जाते. त्यातून नोटीस येते. फॉर्म अपलोड करताना जीएसटी व इन्कम टॅक्सची साइट जाम होणे किंवा ओटीपीसाठी फक्त दहा मिनिटांचा अवधी देणे यामुळे काम वाढले. प्रत्येक व्यवहार सुक्ष्म माहीत तपशिलासह भरावी लागत असल्याने त्रासात वाढ झाली आहे. जीएसटी अंतर्गत आयटीसीमुळे कामाचे ताण वाढले आहे. अनेक अडचणीमुळे कर सल्लागारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचे उत्तर महाराष्ट्र करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल चव्हाण व नाशिक कर सल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख, उपाध्यक्ष निवृत्ती मोरे व सेक्रेटरी राजेंद्र बकरे यांनी खासदार पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

 हेही वाचा > अखेर गूढ उकललेच! म्हणून केली रिक्षाचालकाने 'त्या' गर्भवती महिलेची हत्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tax advisors are fed up with the complicated rules of GST Nashik Marathi news