
गेल्या दोन दिवसांपूर्वी वातावरणातील शीतलहरींमुळे सायंकाळच्या वेळी शहरी, तसेच ग्रामीण भागात शुकशुकाट झालेला बघायला मिळाला. यानंतर तापमानातील पारा वाढल्याने सध्या पुन्हा थंडी गायब झाल्याची अनुभूती नाशिककरांना येऊ लागली आहे. नोव्हेंबर महिना संपत असताना कधी हुडहुडी तर कधी सामान्य वातावरण अनुभवायला मिळते आहे.
नाशिक : गेल्या दोन दिवसांपूर्वी वातावरणातील शीतलहरींमुळे सायंकाळच्या वेळी शहरी, तसेच ग्रामीण भागात शुकशुकाट झालेला बघायला मिळाला. यानंतर तापमानातील पारा वाढल्याने सध्या पुन्हा थंडी गायब झाल्याची अनुभूती नाशिककरांना येऊ लागली आहे. नोव्हेंबर महिना संपत असताना कधी हुडहुडी तर कधी सामान्य वातावरण अनुभवायला मिळते आहे. यंदाच्या हिवाळ्यात नाशिकचे नीचांकी तापमान १०.४ अंश सेल्सियस नोंदविले असताना रविवारी (ता. २९) मात्र नीचांकी तापमान १८.२ अंश सेल्सियस नोंदविले गेले.
नोव्हेंबर महिन्याला सुरवात झाल्यापासूनच वातावरणात गारवा जाणवू लागला होता. त्यातच गेल्या १२ नोव्हेंबरला यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमान १०.४ अंश सेल्सियसची नोंद घेण्यात आली होती. अचानक पारा घसरल्याने नाशिककरांनी स्वेटर, मफलर, जॅकेट, शॉल असे उष्ण कपडे वापरासाठी काढलेले असताना, पुन्हा पारा वधारल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ लागली आहे. दुसरीकडे नाशिकच्या कमाल व किमान तापमानातील तफावत मात्र कमी होते आहे. उत्तर भारतातील होणारी बर्फवृष्टी लक्षात घेता येत्या काही दिवसांत पुन्हा पारा घसरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ढगाळ वातावरण, दक्षिणेकडील वादळाची स्थिती यामुळे वातावरणात बदल जाणवत असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा > आडगावला व्यापाऱ्याला पाच लाखांचा गंडा! ११० क्विंटल लोखंडाच्या मालाचा अपहार
काळजी घेण्याचा सल्ला
वातावरणात होणाऱ्या चढ-उतारामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा वातावरणात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो आहे. विशेषतः पहाटे व सकाळच्या वेळी आणि सायंकाळी वातावरणातील गारव्यापासून बचावासाठी उष्ण कपड्यांचा आधार घ्यावा. आहारासंबंधी पथ्यांचे पालन करण्याचाही सल्ला दिला जातो आहे. श्र्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांनीदेखील आवश्यक त्या उपाययोजना करत काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
गेल्या दहा दिवसांतील वातावरणातील बदलाची स्थिती अशी ः
तारीख किमान तापमान कमाल तापमान
(अंश सेल्सियसमध्ये) (अंश सेल्सियसमध्ये)
२० नोव्हेंबर १९.४ ३०.९
२१ नोव्हेंबर १५.९ ३१.१
२२ नोव्हेंबर १६.० ३१.३
२३ नोव्हेंबर १५.० ३१.३
२४ नोव्हेंबर १६.८ २९.८
२५ नोव्हेंबर १६.९ २९.८
२६ नोव्हेंबर १४.३ २९.३
२७ नोव्हेंबर १३.४ २७.२
२८ नोव्हेंबर १७.२ २६.६
२९ नोव्हेंबर १८.२ ३०.३
हेही वाचा > दुर्देवी! वडिलांनाच पाहावा लागला पोटच्या मुलाच्या मृत्यूचा थरार; पायाखालची जमीनच सरकली