VIDEO : जेव्हा भररस्त्यात दारुचा ट्रक पलटला; विखुरलेल्या बाटल्या बघून शौकिनांची तोबा गर्दी

रोशन खैरनार
Thursday, 29 October 2020

काचेच्या बाटल्या फुटल्याने महामार्गावर काचेचा खचही पडला होता. दारू पडल्याने परिसरात सर्वत्र दारूचा दर्पही पसरला होता. अपघाताचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच परिसरातील मद्य शौकिनांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनेकांनी दारूच्या बाटल्या लांबवल्या.

नाशिक : (सटाणा) नाशिकहून सटाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने देशी दारूच्या बाटल्या घेऊन टेम्पो सुसाट निघाला होता. वाटेत ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक जागीच पलटला. सर्वत्र दारुच्या बाटल्या. दारुच्या बाटल्या लांबविण्यासाठी शौकिनांची उडाली झुंबड. वाचा सविस्तर प्रकार

रस्त्यावर विखुरलेल्या मद्याने शौकिनांची दिवाळीच 

गुरुवारी (ता. २९) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नामपुर व ताहराबाद (ता.बागलाण) देशी दारू घेऊन टेम्पो (क्र.एम.एच.१५ एजी ५८८६) घेऊन जात होता. शहरानजीक साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील मोरेनगर (ता.बागलाण) गावाजवळ महावितरणच्या सबस्टेशन येताच टेम्पोच्या डाव्या बाजूचे मागचे टायर अचानक फुटले. टेम्पो जागीच पलटी झाला. टायर फुटल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ महामार्गावर धाव घेतली. यावेळी पलटी झालेल्या टेम्पोतून दारूचे खोके रस्त्यावर पडून काचेच्या बाटल्या फुटल्याने महामार्गावर काचेचा खचही पडला होता. दारू पडल्याने परिसरात सर्वत्र दारूचा दर्पही पसरला होता. अपघाताचे वृत्त वार्‍यासारखे पसरताच परिसरातील मद्य शौकिनांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनेकांनी दारूच्या बाटल्या लांबवल्या. टेम्पो उलटल्याने राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

ड्रायव्हरसह इतर चार जण गंभीर जखमी 

सामाजिक कार्यकर्ते परशुराम पाकळे, पिंपळदरचे सरपंच संदीप पवार, बाळा देवरे आणि महावितरणच्या कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दारूच्या बाटल्यांच्या खोक्याखाली अडकलेल्या वाहनचालक व कामगारांना बाहेर काढले. तत्काळ सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी हलवले. या अपघातात शुभम रवी नायर (वय २६, नाशिक) याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. चेहर्‍यास दारूच्या बाटल्यांचे काच लागून गंभीर जखमा झाल्या आहेत. तर चालक फकिरा बळवंत बर्वे (वय ५०), संजय नामदेव डांबेकर (वय ५२), देवीदास श्रीधर भालेराव (वय २८), आनंद शंकर पगारे (सर्व रा.नाशिक) हे किरकोळ जखमी झाले आहेत. 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल पुंडलिक डंबाळे, अजय महाजन, योगेश गुंजाळ, विलास मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गर्दी पांगवली आणि पलटी झालेला टेम्पो सरळ करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. सटाणा पालिकेचा अग्निशमन बंबाद्वारे दत्तू नंदाळे व भूषण सोनवणे यांनी अपघातस्थळी पाडलेल्या काचेचा खच दूर करण्यास मदत केली. 

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tempo of transporting native liquor near Satana is reversed nashik marathi news