आधी थंड बिअरवर ताव, नंतर केले दुकान साफ; चोराचा अजब कारनामा!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

काय बोलावं आता ह्या चोरांना...प्रकारच असा घडला की, सकाळी जेव्हा मालकाला चोरी झाल्याचे कळले तेव्हा चोरांच्या कारनाम्याने हसावं की रडावं असाच काहीसा प्रश्न घडला. वाचा नेमके काय घडले?

नाशिक : काय बोलावं आता ह्या चोरांना...प्रकारच असा घडला की, सकाळी जेव्हा मालकाला चोरी झाल्याचे कळले तेव्हा चोरांच्या कारनाम्याने हसावं की रडावं असाच काहीसा प्रश्न घडला. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कडेला वावीच्या पूर्वेला गावाबाहेर गणेश शिवदास क्षत्रिय यांचे समृद्धी बिअर बारचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागेच हॉटेलचा कुक व सुरक्षा रक्षक राहायला असून दूकानाभोवती संरक्षक भिंतदेखील आहे. तरीही चोरट्यांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास डाव साधलाच. दुकानाचे शटर वाकवून चोरटे किचनमध्ये शिरले. तेथे असलेल्या चावीचा चुडगा घेऊन चोरट्यांनी उर्वरित रूम उघडल्या. इतकेच नाही तर, चोरट्यांनी फ्रीजमध्ये असलेल्या बिअरच्या बाटल्यांचाही आस्वाद घेतला. दुकानात ठेवलेले इंग्लिश दारुचे महागडे बॉक्स व बिअरचे काही बॉक्स घेऊन चोरटे पसार झाले.  चोरट्यांनी सोबत चारचाकी वाहन आणली असावी. त्यातच दारूचे बॉक्स भरून ते फरार झाले. गणेश क्षत्रिय यांना पहाटे घडलेल्या प्रकाराबद्दल समजले, त्यांनी वावी पोलिसांत तशी तक्रार केली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्यासह सहकारी चोरट्यांचा शोध घेत आहे.

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

चोरटे सीसीटीव्हीत कैद

क्षत्रिय यांच्या समृद्धी बिअर बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चोरटे चार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानात आले. त्यानंतर त्यांनी दारुचे बॉक्स नेण्यास सुरुवात केली. चोरट्यांचे साथीदार कंपाैंडबाहेर चारचाकी वाहन घेऊन थांबले असल्याची शक्यता असून त्यात बॉक्स घेऊन ते फरार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा >  ‘कोब्रा-घोणस’च्या लढाईचा थरार! मांजराने केली मध्यस्थी; पाहा VIDEO

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves theft beer into bar shop in Wavi nashik crime news