चिंताजनक..! अवघ्या पाच दिवसांत हजाराचा आकडा पार.. 

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 9 July 2020

दिवसभरात आलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्टसोबतच 33 रिपोर्ट हे इनक्‍लिसिव्ह आहेत. या रुग्णांच्या रिपोर्टमधून काहीही निष्पन्न होत नाही, असा अर्थ असला तरीही यातील रुग्ण दगावतात. याच रुग्णांचे रिपोर्ट मृत्युपश्‍चात पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. ही बाब गंभीर असून, इनक्‍लिसिव्ह रिपोर्ट न करता, त्यांची निश्‍चित चाचणी तीही वेळेत होणे आवश्‍यक आहे.

नाशिक : जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये बुधवारी (ता. 8) आणखी 319 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये अवघ्या पाच दिवसांत हजार रुग्णांची भर पडत सहा हजार 132 वर पोहचली. यातील तीन हजार 511 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात बुधवारी पाच रुग्ण कोरोनामुळे दगावले. यात नाशिक शहरातील दोन, तर इगतपुरी, लाखलगाव आणि सटाण्यातील प्रत्येकी एका मृत रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामृतांचा आकडा तीनशेच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

पाच रुग्णांचा मृत्यू; विविध प्रयोगशाळांमध्ये 842 अहवाल प्रलंबित 

दरम्यान, बुधवारी दिवसभरात 33 रुग्णांचे रिपोर्ट हे इनक्‍लिसिव्ह असून, हेच रिपोर्ट मृतांचा आकडा वाढविणारे ठरत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. बुधवारी आलेल्या 319 अहवालातील बाधितांमध्ये सर्वाधिक नाशिक महापालिका क्षेत्रातील 212, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील आठ आणि 99 रुग्ण उर्वरित जिल्ह्यातील आहेत. 

जिल्ह्यातील मृतांचा आकडा तीनशेच्या उंबरठ्यावर 
जुन्या नाशिकच्या कथडा परिसरातील 50 वर्षीय पुरुष, तर सिडकोतील सावतानगरच्या शिवनेरी चौकातील 69 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर नाशिक तालुक्‍यातील लाखलगावातील 62 वर्षीय वृद्ध, सटाण्यातील 60 वर्षीय महिला आणि इगतपुरीतील 65 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात कोरोनामुळे पाच मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील कोरोनामृतांचा आकडा 298 झाला आहे. यामध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील 145, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 76, उर्वरित जिल्ह्यातील 64 तर परजिल्ह्यातील 13 कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. 

865 संशयित रुग्ण दाखल 
बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये तब्बल 865 संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. यामध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयात 17, नाशिक महापालिका क्षेत्रात 586, डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात सहा, मालेगाव महापालिका क्षेत्रात सहा, ग्रामीण भागातील कोविड सेंटरमध्ये 199, तर गृहविलगीकरण कक्षात 51 संशयित रुग्ण आहेत. तर, विविध प्रयोगशाळांमध्ये 842 संशयित रुग्णांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील 254, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 118 तर, उर्वरित जिल्ह्यातील 470 रुग्णांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

175 रुग्ण कोरोनामुक्त 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे रुग्ण कोरोनामुक्तही होत आहेत. बुधवारी 175 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. त्यामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सद्यःस्थितीमध्ये दोन हजार 323 पॉझिटिव्ह रुग्णांवर विविध कोविड रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

 
इनक्‍लिसिव्ह रिपोर्ट ठरताहेत घातक 

बुधवारी दिवसभरात आलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्टसोबतच 33 रिपोर्ट हे इनक्‍लिसिव्ह आहेत. या रुग्णांच्या रिपोर्टमधून काहीही निष्पन्न होत नाही, असा अर्थ असला तरीही यातील रुग्ण दगावतात. याच रुग्णांचे रिपोर्ट मृत्युपश्‍चात पॉझिटिव्ह येतात. त्यामुळे कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. ही बाब गंभीर असून, इनक्‍लिसिव्ह रिपोर्ट न करता, त्यांची निश्‍चित चाचणी तीही वेळेत होणे आवश्‍यक आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands crossed in just five days nashik marathi news