लढणार आणि जिंकणारही...! हजारो शेतकऱ्यांची वाहन मोर्चाद्वारे मुंबईकडे कूच

farmer agitation mumbai.jpg
farmer agitation mumbai.jpg

नाशिक : केंद्र सरकारने शेतकरी हितविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ५८ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता. २३) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वाहन मोर्चा काढला. लाँग मार्चच्या धर्तीवर मुंबईत राजभवनावर धडक देण्यासाठी निघालेल्या या वाहन मोर्चात सीटू कामगार संघटनेचे दुचाकीस्वारही सहभागी झाले. 

प्रजासत्ताकदिनी मुंबईत राजभवनावर धडकणार

केंद्र सरकारवर मनमानी करत असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी काढलेला हा मोर्चा येत्या मंगळवारी (ता. २६) प्रजासत्ताकदिनी मुंबईत राजभवनावर धडकणार आहे. आज नाशिकहून रवाना होण्यापूर्वी झालेल्या जाहीर सभेस अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्यअध्यक्ष किसन गुजर, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सचिव अजित नवले, सहसचिव सुनील मालुसरे, जनवादी महिला संघटनेच्या नेत्या मरियम ढवळे, डीवायएफच्या नेत्या प्रीती शेखर, विद्यार्थी संघटनेच्या कविता वारे आदी उपस्थित होते. 

प्रत्येकी ३० वाहनांचा ताफा

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली सायंकाळी सहाला ईदगाह मैदानावरून ‘लढणार आणि सरकारला कायदे मागे घेण्यासाठी भाग पाडून जिंकणार’, या जिद्दीने राज्याच्या विविध जिल्ह्यांतून आलेले हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी वाहन मोर्चात सहभागी झाले. प्रत्येकी ३० वाहनांचा ताफा ठराविक अंतराने मुंबईच्या दिशेने रवाना झाला. त्यात दुचाकीस्वारही कामगारांचे प्रतिनिधित्व म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात सहभागी झाले. 

घाटनदेवीला मुक्काम 

नाशिकहून निघालेला वाहन मार्च घाटनदेवी येथे मुक्काम करणार असून, तेथे आणखी हजारो वाहनं सहभागी होणार आहेत. रविवारी (ता. २४) सायंकाळी आझाद मैदानावर पोचून सोमवार (ता. २५)पासून मोर्चा राजभवनाकडे निघेल. तीन कृषीविरोधी व चार कामगारविरोधी कायदे, प्रस्तावित वीजबिल मागे घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात येणार आहे. सरकारने याची दखल न घेतल्यास संपूर्ण राज्यभरात जिल्हानिहाय आंदोलन छेडण्यात येईल, अशी माहिती डॉ. ढवळे यांनी दिली. 

घरूनच शिधा 

सलग तीन दिवस आंदोलक मुंबईत जमणार आहेत. शेतकरी, कामगार आंदोलकांनी सोबत शिधा आणला आहे. आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पन्नासहून अधिक सामाजिक संस्था, सीटूप्रणीत कामगार संघटना सक्रिय सहभागी आहेत. कामगारांचा सहभाग दर्शविण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सीटूचे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com