ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 May 2020

लॉकडाऊनच्या काळात दिसेल त्या मार्गाने मायभूमीला परत जाण्याच्या प्रयत्नात मजूर दिसून येत आहे. यातच उपाशीपोटी चालत जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा वाटेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिक : (भुसावळ) उपाशीपोटी चालत जाणाऱ्या परप्रांतीय मजुरांचा वाटेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉकडाऊनच्या काळात दिसेल त्या मार्गाने मायभूमीला परत जाण्याच्या प्रयत्नात मजूर दिसून येत आहे. उपासमारी आणि भुकेमुळे कोणत्याही मजुराचा मृत्यू होणार नाही, असे मोदी सरकारनं आश्वासन दिले आहे. मात्र, या घोषणेनंतर काही तासांतच...

अशी आहे घटना

मुंबईहून उत्तर प्रदेशात आपल्या गावाकडे उपाशीपोटी चालत जाणाऱ्या हरताळा फाटा येथे गुरुवारी सायंकाळी दोन परप्रांतीय मजुरांचा मुक्ताईनगरजवळ मृत्यू झाला. तर एका व्यक्तीच पूर्णा नदीच्या पात्रात मृतदेह आढळला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह दोन तीन दिवसांपासून पाण्यात होता. त्यामुळे मृताची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, या व्यक्तीने उपासमारीला कंटाळून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे बोललं जात आहे. हे परप्रांतीय मजूर आपल्या नातेवाईकांसह त्यांच्या गावी परत जात असताना अचानकपणे दोघांची प्रकृती खालावली. त्यातच दोघांचा मृत्यू झाला. दोघेही मजूर उपाशीपोटी चालत असल्याचं समजतं. सदरील घटनेची माहिती समजताच हरताळाचे पोलिस पाटील यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला याबाबत माहिती कळवली. घटनास्थळी मृतांची तपासणी करण्यात आली. दोघांचे स्वॅबचे नमुने घेतण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक चित्र! माऊलीच्या पायाला जखमा.. पोळले तळवे.. पण बाळाला दारिद्रयाचे चटके नको!

दोन दिवसानंतर अहवाल आल्यानंतरच त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, हे स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हे परप्रांतीय मुंबईसारख्या रेड झोन येथून आल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना मुक्ताईनगर येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेले लाखो मजूर आपल्या कुटुंबीयासह महाराष्ट्रातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात स्थलांतर करत आहे. काही मजूर मिळेल त्या वाहनाने तर बहुतांश मजुरांनी पायी चालत जाणं पसंत केलं आहे.

हेही वाचा > मालेगावच्या रुग्णाचा व्हॉटसऍपने लागला शोध.. समजले तेव्हा कुटुंबियांना धक्का! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tired workers starved to death, two died on the way, one jumped into the river nashik marathi news