ग्रामपंचायत गैरव्यवहारप्रकरणी दोघा अभियंत्यांवर प्रशासकीय कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

गैरव्यवहारप्रकरणी टोकडे विकास ग्रुपने विठोबा द्यानद्यान यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीसमोर 65 दिवस चक्री उपोषण केले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपोषण मागे घेतले होते.​

नाशिक / मालेगाव : टोकडे ग्रामपंचायतीतील समाजमंदिर, घरकुल, शौचालय गैरव्यवहार प्रकरणी चांदवड येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समितीच्या तिसऱ्या अहवालानंतर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाखा अभियंता, उपअभियंता यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई, तर सरपंच सुपडाबाई निमडे यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित केली आहे. ग्रामसेविका सुमित्रा गायकवाड यांना यापूर्वीच निलंबित केले आहे. 

सरपंचांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे 
टोकडे येथील गैरव्यवहारप्रकरणी टोकडे विकास ग्रुपने विठोबा द्यानद्यान यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीसमोर 65 दिवस चक्री उपोषण केले होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उपोषण मागे घेतले होते.

दोघा अभियंत्यांवर प्रशासकीय कारवाई 

येथील गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल सादर केला होता. मात्र, आंदोलकांनी हा अहवाल अमान्य केल्यानंतर चांदवड गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ चौकशी समितीने अहवाल सादर केला. त्यानंतर शाखा अभियंता, उपअभियंत्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात आली, तर सरपंचांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने समाजमंदिर, घरकुल व वैयक्तिक शौचालय बांधकामासह विविध विकासकामांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाने दोषी असलेल्यांकडून गैरव्यवहाराची रक्कम वसूल करावी. फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा द्यानद्यान यांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tokade Gram Panchayat malpractice case Administrative action against two engineers