मका उत्पादनात येवलेकर जिल्ह्यात अव्वल! मक्याला बनविले मुख्य पीक

संतोष विंचू
Wednesday, 18 November 2020

दुष्काळी असूनही प्रयोगशील येवलेकरांनी यंदा मकाला मुख्य पिक बनवले अन पावसाने नुकसान करूनही निगा राखल्याने जिल्ह्यात एकरी उत्पादनात अव्वल ठरले आहे.

येवला (जि.नाशिक) : दुष्काळी असूनही प्रयोगशील येवलेकरांनी यंदा मकाला मुख्य पिक बनवले अन पावसाने नुकसान करूनही निगा राखल्याने जिल्ह्यात एकरी उत्पादनात अव्वल ठरले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील १० तालुक्यातीत पिकांची उत्पादकता काढली असून सर्वाधिक एकरी २३.२६ क्विंटल उत्पादकता येथे तर सर्वात कमी उत्पादकता १४.१७ क्विंटल सटाण्याची ठरली आहे.

मका खरेदीला जिल्ह्याची सरासरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड

असे असले तरी शासकीय हमिभावाने मका खरेदीसाठी जिल्ह्याची सरासरी १७.५० क्विंटलची मर्यादा निच्छित केल्याने अधिक उत्पादकता असलेल्या येवला,निफाड,सिन्नर,दिंडोरी,चांदवडच्या शेतकऱ्यावर हा अन्यायच मानला जात आहे.  कृषि विभागाने पिक कापणी प्रयोगातून तालुकानिहाय उत्पादकता ठरवली आहे.येवला तालुका कृषी विभागाने मकाची प्रति हेक्टरी ५८.१६ क्विंटल, बाजरी बागायत २८.६३ क्विंटल व जिरायत २४.९ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादनाचा अहवाल जिल्हा कृषी आधिकारी यांना पाठवला होता. तसा अहवाल प्रत्येक तालुक्याचा पाठवला गेला असून कृषी विभागाने दिलेली जिल्ह्याची सरासरीनुसार जिल्हा मार्केटिंग आधिकारी यांनी उत्पादनाची सरासरी ग्राहय धरल्याने याचा फटका तालुक्याला बसला आहे.

कमाल मर्यादप्रमाणे खरेदी होणार

जिल्हा मार्केटिंग आधिकाराच्या आदेशान्वये बागायत बाजरी एकरी ६.६७ क्विंटल, जिरायत बाजरी एकरी ६.३०, व मका एकरी १७.६७ क्विंटल या कमाल मर्यादप्रमाणे खरेदी होणार आहे.या वर्षी मकाचे उत्पादन एकरी २० ते २५ क्विंटल व बाजरीचे उत्पादन १२ ते १४ क्विंटल असल्याने कागदांच्या या खेळात हमी भाव विक्री योजनेत शेतकरी आपला संपूर्ण शेतमाल विक्री करू शकणार नाही हे मात्र वास्तव आहे.परिणामी शिल्लक शेतमाल कवडीमोल भावात विकून बाजरी व मका उत्पादकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

येवल्यात विक्रमी नोंदणी!
हमीभाव व बाजारभावात मोठी तफावत असल्याने तालूक्यातील ९५० शेतकऱ्यांनी शासकिय आधारभुत किंमत योजने अर्तगत मका,बाजरी शेतमाल विक्री करण्यासाठी तालुका खरेदी विक्री सहकारी संघात १५५० खातेधारकांचे कागदपत्र ऑफलाईन सादर केली आहे.पैकी ६३० शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाली असुन दिवाळीनंतर लगेच खरेदी केंद्र सुरू होणार आहे. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

तालूकानिहाय पिक उत्पादन....(हेक्टरी क्विंटलमध्ये)
तालूका   -   बाजरी   -  बाजरी   -   मका
           (जिरायत)   (बागायत)
निफाड  -   13.40  -  .....     -  58.05
सिन्नर  -  12.29  -  13.45   - 47.39
येवला     -    22.86  -  28.63 -  58.16
चांदवड -  17.10   - ........ -  47.21
सटाणा  -   15.22  - 12.39  -  35.43
मालेगाव -  16.17  -  .......  - 41:03
देवळा    - 16.41  - 16.34  - 41.63
दिंडोरी   - ........   -  ........  - 49.50
कळवण  -  10.09  -  10.47 - 35.80
नांदगाव   - 18.00  -  ........ – 42.94 
एकुण    - 15.77   -  16.68  - 44.18

हमीभावाने विक्रीस अडचणी

“जिल्हा कृषी अधिकारी अहवाल व वास्तविकतेत जिल्हयात मका व बाजरी उत्पादनात तालूका अग्रस्थानी आहे.बाकीच्या तालूक्यात सरासरी उत्पादन कमी असल्याने व जिल्हयाची सरासरी ग्राहय धरल्याने येवला तालूक्यातील मका बाजरी उत्पादकांवर हा अन्याय आहे.यामुळे अनेकांचे उत्पादन अधिक निघूनही पूर्ण मका हमीभावाने विक्रीस अडचणी येणार आहे.”-भागुनाथ उशीर,माजी सरपंच, सायगाव

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

“जिल्हयात प्रत्येक तालूकाच्याची सरासरी वेगळी असताना मका खरेदीला मात्र एकच उत्पादकता ग्राह्य धरणे चुकीचे आहे.पिक अहवालानुसार प्रत्येक तालुकाला उत्पादकतेनुसार खरेदीचे उद्धिष्ट द्यावे.या निकषाने खरेदी झाली तर तालूक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळेल.”-दिनेश आव्हाड,माजी अध्यक्ष व संचालक,खरेदी विक्री संघ,येवला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Top in maize production is Yeola in nashik district marathi news