महावितरणच्या वीजवहिनीसाठी झाडांची कत्तल; वावी-मिठसागरेदरम्यान अनेक झाडांवर कुऱ्हाड 

अजित देसाई
Friday, 16 October 2020

मीठसागरे रस्त्यालगतच्या अनेक झाडांची उघडपणे कत्तल करण्यात आली आहे. अनेक डेरेदार वृक्षांच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या असून काही ठिकाणी झाडे खोडापासून वेगळी करण्यात आली आहे.

सिन्नर (जि.नाशिक) : वीज महावितरण कंपनीकडून वावी (ता. सिन्नर) येथील वीज उपकेंद्रतून शिंदेवाडी फीडर जोडण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या नवीन उच्च दाबाच्या वाहिनीसाठी ठेकेदारामार्फेत मिठसागरे रस्त्यावरील अनेक झाडांची कत्तल केली जात आहे. यात वन विभागाने वृक्षलागवड योजनेंतर्गत दोन ते तीन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या झाडांचाही यात समावेश आहे. 

महावितरणच्या वीजवहिनीसाठी झाडांची कत्तल 
हरित महाराष्ट्र उद्दिष्टपूर्तीसाठी शासनाकडून दर वर्षी करोडो रुपयांचा खर्च होत असतो. सिन्नरच्या सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यातील वावी ते हिवरगाव या ओझर-शिर्डी राज्य महामार्गालगत दोन वर्षांपूर्वी सुमारे साडेचार हजार झाडांची लागवड केली होती. मात्र महावितरणच्या वीजवहिनीसाठी याच झाडांवर आता महावितरणची वक्रदृष्टी पडली आहे. नवीन वहिनी टाकण्याच्या नावाखाली लागवड केलेल्या अनेक झाडांचे ठेकेदाराने नुकसान केले असून, त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या बांधावर वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या कडूलिंबासह बाबळीच्या अनेक झाडांचादेखील बळी घेण्यात आला आहे. पर्यावरणप्रेमींनी याकडे लक्ष वेधत संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

वावी-मिठसागरेदरम्यान अनेक झाडांवर कुऱ्हाड 
वावीच्या वीज उपकेंद्रतून शिंदेवाडी फिडरसाठी स्वतंत्रपणे नवीन वहिनी टाकण्यात येत आहे. यासाठी मीठसागरे रस्त्यालगतच्या अनेक झाडांची उघडपणे कत्तल करण्यात आली आहे. अनेक डेरेदार वृक्षांच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या असून काही ठिकाणी झाडे खोडापासून वेगळी करण्यात आली आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह वनविभागाकडे तक्रार केल्यानंतर झालेल्या वृक्षतोडीची पाहणी करण्यात येईल व दोषी असल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले. 
हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 

वीजवाहिनीसाठी रस्त्यालगत असणाऱ्या झाडांवर कुऱ्हाड चालवताना ठेकेदाराने कडुनिंबाची संरक्षित झाडेदेखील सोडली नाहीत. महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर आम्हाला झाडे तोडायला परवानगी घेण्याची गरज नाही असे उत्तर मिळाले. - बाबासाहेब कांदळकर, सामाजिक कार्यकर्ते 

संपादन - ज्योती देवरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree cutting for MSEDCL power lines nashik marathi news