अपयश लपविण्यासाठी टीआरपी कारवाई; भाजप माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांची टीका

प्रशांत कोतकर
Sunday, 11 October 2020

आता काही माध्यमांवर झालेल्या कारवाईनिमित्ताने भाजपला लक्ष्य करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न म्हणजे ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ असाच प्रकार आहे. मतदार मोदी सरकारविरुद्धच्या अशा अपप्रचाराला थारा देत नाहीत, हे २०१९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. 

नाशिक : प्रेक्षकसंख्या वाढविण्यासाठी गैरप्रकार करणाऱ्या वाहिन्यांवर कारवाई झालीच पाहिजे, मात्र या वाहिन्यांच्या आडून भाजपवर टीका करणारे काँग्रेस प्रवक्ते आपल्या भविष्यकाळातील पराभवासाठीच्या सबबी शोधत असावेत. महाविकास आघाडी सरकारला सर्व स्तरांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांनी केली आहे. 

भाजप माध्यम विभागप्रमुख विश्वास पाठक यांची टीका 

श्री. पाठक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की काँग्रेसने गेल्या पाच-सहा वर्षांत ईव्हीएम, निवडणूक आयोग यांच्यावर आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे. जनतेने आपल्याला नाकारले हे खुल्या दिलाने मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेतृत्व मतदान यंत्रे, निवडणूक आयोग यांच्यावर दोषारोप करत आहेत. पूर्वी पराभवानंतर मतदान यंत्रे, निवडणूक आयोग वगैरेंवर खापर फोडले जायचे. आता निवडणुकांपूर्वीच निमित्त शोधण्याचा प्रकार चालू आहे. आता काही माध्यमांवर झालेल्या कारवाईनिमित्ताने भाजपला लक्ष्य करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न म्हणजे ‘आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी’ असाच प्रकार आहे. मतदार मोदी सरकारविरुद्धच्या अशा अपप्रचाराला थारा देत नाहीत, हे २०१९ च्या निवडणुकीत सिद्ध झाले आहे. 

अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर

राफेल विमानांच्या खरेदीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चिखलफेक केली. मात्र, मतदारांनी २०१४ पेक्षाही अधिक जागा देऊन काँग्रेसला सणसणीत चपराक लगावली होती, याचा काँग्रेसला विसर पडलेला दिसतो. देशात घडलेल्या कोणत्याही घटनेला भाजपला जबाबदार धरण्याऐवजी मतदार आपल्याला वारंवार का नाकारतात, याचे आत्मपरीक्षण काँग्रेसने करावे. राज्यातील महाविकास आघाडीला वेगवेगळ्या आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी या कारवाईचा वापर केला जात असावा, अशी शंका घेण्यास जागा आहे. अन्यथा मुंबईच्या पोलिस आयुक्तांना पत्रकार परिषद घेऊन आपली कार्यक्षमता जगजाहीर करण्यास सांगण्याचे काहीच कारण नव्हते, असेही श्री. पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

हेही वाचा > हाउज द जोश : 69 वर्षीय 'आजी'ने हरिहर किल्ला केला सर; तोही अवघ्या चार तासांत! पाहा VIDEO

त्या वाहिन्यांवर कारवाई करणे समर्थनीयच

एखादी वाहिनी गैरप्रकार करून आपली प्रेक्षकसंख्या फुगवून दाखवीत असेल, तर त्या वाहिन्यांवर कारवाई करणे समर्थनीयच आहे. भाजप अशा गैरप्रकारांना कदापि पाठीशी घालणार नाही. मात्र, राजकीय सूडबुद्धीने एखाद्या वाहिनीला लक्ष्य केले जात असेल, तर त्याला भाजप जोरदार विरोध करेल. महाराष्ट्रातील सत्तारूढ पक्षांना अडचणीच्या ठरतील, अशा बातम्या प्रसारित केल्या म्हणून दूरचित्रवाणी वाहिन्यांना काही ना काही निमित्ताने कोंडीत पकडले जात असेल, तर ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल, असेही श्री. पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे.  

हेही वाचा > अशी ही माणुसकी! रस्त्यात सापडलेले पन्नास हजार केले परत; प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TRP action to hide failure - vishwas pathak nashik marathi news