विश्‍वास नांगरे-पाटील यांचा आणखी एक खुलासा..! 'त्या' कामगिरीसाठी गुन्हे शाखेला ५० हजारांचे पारितोषिक

vishwas-nangre-patil-nashik 12345.jpg
vishwas-nangre-patil-nashik 12345.jpg

नाशिक :  पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अवघ्या आठवडाभरात उघडकीस आणलेल्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. त्यात त्यांनी युनिट एकच्या पथकाला ५० हजारांचे पारितोषिक जाहीर केले. अशी कोणती कामगिरी पथकाने केली की त्याचे सर्वत्र होतेय कौतुक..वाचा सविस्तर

एकवीस लाखांच्या घरफोडीची आठवडाभरात उकल 

भद्रकालीत २२ जुलैला गुदामाला ट्रक लावून २२ लाखांची घरफोडी करणाऱ्या गोध्रा (गुजरात) येथील आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला यश आले असून, शुक्रवारी (ता. ३१) पोलिसांनी ट्रकसह सुमारे ४१ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. यात गुजरातच्या दोघा सराईतांच्या मुसक्या आवळून पोलिसांनी नाशिकला आणले असून, त्यांच्याकडून सिन्नर येथील टायर दुकान सुरेंद्रनगर (गुजरात) येथील आणखी दोन घरफोड्यांची उकल झाली आहे. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी अवघ्या आठवडाभरात उघडकीस आणलेल्या गुन्ह्याच्या तपासाबद्दल पत्रकार परिषद घेऊन माहिती देत, युनिट एकच्या पथकाला ५० हजारांचे पारितोषिक जाहीर केले. उपायुक्त अमोल तांबे, समीर शेख हेही उपस्थित होते.

ट्रक लावून गुदाम लुटणारी गुजरातची आंतरराज्य टोळी जेरबंद  
भद्रकालीतील तिगरानिया रोडवरील ट्रॅक्टर हाउस परिसरातील मेट्रिक्स डिस्ट्रिब्यूटर्स प्रा.लि. कंपनीचे गुदाम फोडून चोरट्यांनी रातोरात १३२ एलईडी आणि आठ वातानुकूलित यंत्रांसह २२ लाख रुपयांचा ऐवज लुटला होता. गुदामाला रात्रीतून ट्रक लावून सगळा माल भरून नेला. सीसीटीव्ही सुरू असल्याचे लक्षात आल्यावर काही वेळाने त्याच्यावर कापड टाकले होते. या गुन्ह्याचा तपास लावण्यात शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे निरीक्षक आनंदा वाघ, सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाला यश आले.

२१ लाखांच्या घरफोडीची उकल  

संशयित गुजरातमधील असल्याची माहिती मिळाल्यावरून या पथकाने गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील गोध्रा येथे जाऊन तेथील पोलिसांच्या मदतीने अश्‍फाक अब्दुला जबा (धंतेला, अमीरपूर रोड, गोध्रा) तसेच खालीद याकूब चरखा (गुहिया मोहल्ला, गोध्रा) या दोघा संशयितांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडील १३२ पैकी १२९ एलईडी, आठ वातानुकूलित यंत्रे आणि गुन्ह्यात वापरलेला ट्रक असा सुमारे ४१ लाख ८८ हजारांचा ऐवज हस्तगत केला. पथकातील हवालदार वसंत पांडव, शांतराम महाले, गणेश वडजे, राकेश हिरे, नाझीम पठाण, दत्तात्रय बोटे आदींच्या 
पथकाने ही कारवाई केली. 

सिन्नरला घरफोडी 
गोध्रा येथील घरफोड्या करणारी ही टोळी आंतरराज्य गुन्हे करणारी सराईतांची टोळी आहे. त्यांनी २२ जुलैला घरफोडीपूर्वी सिन्नरला एका टायर दुकानाचे शटर तोडून २०९ टायर चोरले होते. तसेच सुरेंद्रनगर (गुजरात) येथेही घरफोडी करीत दोन लाख ८६ हजारांचे टायर चोरल्याचे उघडकीस आले आहे. तसेच या टोळीचे महाराष्ट्रातील गुन्हेगारांशी लागेबांधे असल्याचेही पुढे आले आहे. मात्र अद्याप दोघेच संशयित ताब्यात असल्याने पोलिस या प्रकरणी अधिक माहिती उघड करू इच्छित नसल्याचे सांगून श्री. नांगरे-पाटील यांनी या प्रकरणात स्थानिक संशयितांसह अनेक मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. 
 



 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com