विवाहाचे वेध! विवाह रखडलेल्या वधू- वरांना दिलासा; नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय 

विनोद बेदरकर
Thursday, 8 April 2021

मार्चमध्ये वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नाशिकमध्ये लग्नसमारंभ करण्यास निर्बंध घातले होते. त्या मुळे अनेक विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह रखडले होते. अशा कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : मार्चमध्ये वाढलेल्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने नाशिकमध्ये लग्नसमारंभ करण्यास निर्बंध घातले होते. त्या मुळे अनेक विवाहयोग्य मुला-मुलींचे विवाह रखडले होते. अशा कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.

नियम पाळूनच विवाह करण्याचा नाशिक वेडिंग इंडस्ट्रीचा निर्णय 

प्रशासनाचे आदेश प्राप्त होताच मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशयन, तसेच विवाहविषयक सेवा देणाऱ्या सर्व असोसिएशनची बुधवारी (ता. ७) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. त्यात कुठल्याही प्रकारची हयगय झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंगल कार्यालयाचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात येईल, असे नाशिक जिल्हा मंगल कार्यालय, हॉल व लॉन्स असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले. पोलिसांनी मंगल कार्यालयात विवाहांना परवानगी देऊन दिलासादायक निर्णय दिल्याने लॉन्स, मंगल कार्यालय व्यावसायिकांसह विवाह ठरलेल्या कुटुंबात उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा - नांदगाव हत्याकांडाचे गुढ अखेर उलगडले! नऊ महिने अन् दिडशे जबाबानंतर पोलिसांना यश

अन्यथा मंगल कार्यालयाचे सभासदत्व कायमचे रद्द

प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून व नियमाप्रमाणे मर्यादित लोकांच्या उपस्थित विवाह बुकिंग करून घेणे व पूर्वी झालेल्या बुकिंगचे विवाह ठरलेल्या तारखांना शासकीय नियमानुसार संपन्न करण्याचे ठरविण्यात आले. नाशिकमधील सर्व मंगल कार्यालयांनी शासनाने घालून दिलेल्या नियम व निर्बंधानुसार विवाह सोहळे पार पाडावेत. यात कुठल्याही प्रकारची हायगय झाल्यास, तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास त्या मंगल कार्यालयाचे सभासदत्व कायमचे रद्द करण्यात येईल, असे नाशिक जिल्हा मंगल कार्यालय, हॉल व लॉन्स असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळबळ

केटरर्सनेसुद्धा मर्यादित लोकांचीच भोजनव्यवस्था
लग्नकार्यात केटरर्सनेसुद्धा मर्यादित लोकांचीच भोजनव्यवस्था करण्याचे कबूल केले आहे. मंगल कार्यालय सुरू होताच तत्सम एजन्सीजद्वारे अनेकांच्या रोजगाराला हातभार लागणार आहे. मर्यादित ५० पाहुण्यांनाच आमंत्रित करावे, असे आवाहनसुद्धा लॉन्स असोसिएशनतर्फे करण्यात आले. विवाह समारंभ परवानगीकरिता फार्म नंबर सहाची पूर्ण पूर्तता करून पोलिस कमिशनर ऑफिस येथे सर्व मंगल कार्यालयांनी विवाह समारंभाच्या परवानगीसाठी अर्ज करावयाचे आहेत. तसेच विनापरवानगी कुठलाही कार्यक्रम कार्यालयात करू नये, असा ठोस निर्णय घेण्यात आला.  

सर्व असोसिएशनची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

या बैठकीत लॉन्स असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चोपडा, वेडिंग फेडरेशनचे अध्यक्ष संदीप काकड, उपाध्यक्ष उत्तमराव गाढवे, केशवराव डिंगोरे, मंगल कार्यालय असोसिएशनचे सेक्रेटरी शंकरराव पिंगळे, सहसेक्रेटरी समाधान जेजुरकर, खजिनदार भाऊसाहेब निमसे, डायरेक्टर विक्रांत मते, जितेंद्र राका, सुरेंद्र कोठावळे, प्रसाद पोरजे, बाळासाहेब तांबे, सचिन भोर, नीलेश मकर, देवदत्त जोशी, अनिल जोशी, योगेश खैरनार उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wedding according to rules Decision of Nashik Wedding Industry marathi news