कोविड खाटांसाठीचा खटाटोप खरा किती अन्‌ खोटा किती?...नेमका प्रकार काय?

covid ward nashik.jpeg
covid ward nashik.jpeg
Updated on

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. त्याचवेळी कोरोनाशी दोन हात करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केलेल्या तयारीतील 300 खाटा रिकाम्या आहेत. मग प्रश्‍न पडतो तो म्हणजे, नाशिकमधील रुग्णालये फुल झाल्याचा प्रचार करत घाबरवण्याचा प्रयत्न का केला जातोय? प्राप्त परिस्थितीत त्यामागे वेगळा हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसतय. खासगी रुग्णालयांच्या पॅकेजसचे उखळ पांढरे करण्यापासून सरकारी लाभ उकळण्यापर्यंतचा उद्देश यामागे आहे काय? हे तपासावे लागेल. 

सरकारी रुग्णालयात 14 व्हेंटिलेटर

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दाव्यानुसार अजूनही 300 खाटा रिक्त आहेत. कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण सौम्य आजाराचे आहेत. त्यामुळे आताच्या "मेडिकल प्रोटोकॉल'नुसार असे रुग्ण घरी उपचार घेऊ शकतात. उरलेल्या तीस टक्‍क्‍यांमध्ये दहा टक्के मध्यम आणि वीस टक्के तीव्र आजाराचे रुग्ण असतात. या तीस टक्के रुग्णांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागते. वीस टक्‍क्‍यांमधील चार रुग्ण दगावण्याची शक्‍यता असते. आजवरची रुग्णसंख्या आणि दगावलेले रुग्ण यांचे प्रमाण सहा टक्‍क्‍यांपर्यंत आहे. ही सरकारी आरोग्यमधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती उपलब्ध झाल्यावर शहरामध्ये नेमकी काय स्थिती आहे, याचा आढावा घेण्यात आला. त्यावर सर्वसाधारणपणे 50 व्हेंटिलेटरची आणि तत्पूर्वीच्या 25 यंत्रांची सुविधा शहरामध्ये उपलब्ध असल्याची माहिती पुढे आली. जिल्हा सरकारी रुग्णालयात 14 व्हेंटिलेटर आहेत. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील 70 खाटांची व्यवस्था आता दीडशेपर्यंत नेण्यात आली आहे. ऑक्‍सिजनचे काम सुरू आहे. त्यातील शंभर खाटांसाठी ही सोय झाली. उर्वरित काम सुरू आहे. 

खासगीच्या एक हजार खाटा आरक्षित 

महापालिकेच्या तपोवन रुग्णालयात 40, समाजकल्याण वसतिगृहात 300, नाशिक रोड अग्निशमन वसाहतमध्ये 100, जिल्हा सरकारी रुग्णालयात 100 खाटा अशा एकूण 700 खाटा आहेत. त्यातील 400 खाटांवर रुग्ण आहेत. शिवाय खासगी रुग्णालयांमध्ये महापालिकेने 385 खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेच्या शहरातील 21 रुग्णालयांत 745 खाटा महापालिकेने रुग्णांसाठी आरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात एक हजार खाटा आरक्षित आहेत. पंचवटी विभागामध्ये 577 खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, 87 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विभागातील एकूण 234 रुग्णांपैकी आठ जणांचा मृत्यू झाला असून, 112 रुग्ण बरे झाले आहेत. सद्यःस्थितीत 114 रुग्णांवर उपचार सुरू असले, तरीही 27 जण घरी उपचार घेताहेत. भविष्यात तपोवनच्या धर्तीवर मेरी आणि नाशिक रोड परिसरात कक्ष उभारण्याचे संकेत मिळाले आहेत. 

बिटको रुग्णालयात 33 रुग्ण पॉझिटिव्ह 

वडाळा येथील महापालिकेच्या रुग्णालयाच्या तयारीचा वेग मंद आहे. 15 दिवसांपूर्वी चार दिवसांत इथे 35 खाटांचे कोविड रुग्णालय सुरू करण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. सध्या इथे तीस खाटा ठेवण्यात आल्या आहेत. वडाळागावातील रुग्णांची संख्या आणि इंदिरानगर, श्रद्धाविहार भागात वाढणारे रुग्ण लक्षात घेता तातडीने हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची गरज निर्माण झाली असल्याची बाब सोमवारी (ता. 22) स्थानिक नगरसेवक भेट घेऊन आयुक्तांच्या निदर्शनास आणून देणार आहेत. नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीत 33 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. 39 खाटा शिल्लक आहेत. सिन्नर फाटा, दसक येथील वैद्यकीय केंद्रात सध्या रुग्णांचा फॉलोअप, सर्वेक्षण बाहेरगावहून आलेल्या लोकांच्या हातावर शिक्का मारला जातो. नाशिक रोडला खासगी रुग्णालयात उपचार सुरू नाहीत. येथील अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कॅन्टोन्मेंट रुग्णालय, देवळाली कॅम्प येथे उपचार घेणे पसंत करतात. 

ठक्कर डोममध्ये 500 खाटांचे कोविड केअर सेंटर
 
नाशिकमधील ठक्कर डोममध्ये "क्रेडाई'च्या सहकार्याने पाचशे खाटांचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. क्रेडाई पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बैठक झाली. माजी खासदार समीर भुजबळ, "क्रेडाई'चे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कुणाल पाटील, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, सदस्य अतुल शिंदे आदी उपस्थित होते. कोविड केअर सेंटरमध्ये महापालिकेतर्फे आवश्‍यक स्टाफ व आरोग्य सुविधा पुरविण्यात येईल आणि महापालिका अधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील, असे श्री. गमे यांनी स्पष्ट केले. श्री. महाजन म्हणाले, की "क्रेडाई'ने महापालिका रुग्णालयात पाच डिजिटल एक्‍स-रे मशिन, पाच इसीजी मशिन, 100 ऑक्‍सिमीटर, 50 थर्मल स्कॅनर, हेल्थ केअर ऍप, नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी एक हजार पीपीई कीट, मास्क, ग्रामीण पोलिसांना एक हजार पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, शहर पोलिसांना साडेतीन हजार च्यवनप्राश बाटल्या, पाच हजार गरिबांना अन्नधान्य, सरकारी-निमसरकारी कार्यालयात 100 सॅनिटायझर स्टॅंड, दहा सॅनिटायझर बूथ यांसह विविध वस्तूंचे वाटप केले. 

ऑक्‍सिजन सॅच्युरेशन कमी झालं? 
मग जा मविप्र रुग्णालयामध्ये! 

ऑक्‍सिजन सॅच्युरेशन कमी झालं? मग सोप्प... जा "मविप्र'च्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात. ही नाशिकमध्ये नेमकी काय गंमत चाललीय, याचं कोडं उलगडत नाही. एकीकडे सगळी तयारी असताना मग रुग्णालयात ऑक्‍सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण 40 ते 50 पर्यंत कमी झाल्यावर रुग्णांना पाठवण्यामागे काही कारण आहे काय? याचा शोध घेण्याची आवश्‍यकता आहे. गेल्या आठवड्यात या रुग्णालयात खासगी रुग्णालयातून असे बारा रुग्ण पाठवण्यात आले. मुळातच, इथे सहा व्हेंटिलेटर आहेत. या रुग्णालयात गंभीर झालेले रुग्ण पाठवले जातात म्हटल्यावर महापालिकेने पाच एनआयव्ही व्हेंटिलेटर पाठवून दिले. महाविद्यालयातर्फे त्याच्या अभियंत्याला शोधून काढण्यात आले. अभियंत्याने सांगितल्यानुसार संबंधित डॉक्‍टरांना बोलवण्यात आले. त्या डॉक्‍टरांनी आपणाला जमत नाही म्हणून सांगितले. हे कमी म्हणून की काय जिल्हा रुग्णालयाकडून पाच पॅकबंद खोक्‍यातून एनआयव्ही व्हेंटिलेटर पाठवण्यात आले. त्यांच्या अभियंत्याला संपर्क साधल्यावर व्हेंटिलेटर चालू करण्याचा व्हिडिओ पाठवून देतो, असे सांगून अभियंता नामानिराळा झालाय. 

सरकारच्या निर्देशानुसार बिल करा अदा 

कोरोनावरील उपचारासाठी सरकारने खासगी रुग्णालयांसाठी दर निश्‍चित केलेत. त्यानुसार बिलाची आकारणी व्हायला हवी. ज्या रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजना लागू आहे, अशा ठिकाणी रुग्ण भरती झाल्यास बिल कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर सरकारतर्फे देण्यात येते. अशा रुग्णालयांची माहिती व त्यांचे संपर्क क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ही बाब महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे स्पष्ट करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरात कोरोना रुग्णांसाठी खाटा नाहीत हे म्हणणे चुकीचे असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये 700 खाटांची व्यवस्था आहे. त्यातील 300 खाटा रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णावर उपचारात कुठलीही अडचण नाही. - डॉ. राजेंद्र त्र्यंबके, वैद्यकीय अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com