
कोरोनामुळे दहा महिन्यापासून यात्रा-जत्रा बंद आहेत. परिणामी, कुस्त्यांची दंगल व बक्षिसांची लयलूट थांबली आहे. कुस्त्या बंद असल्याने पहिलवानांना कसरतीसाठी खाद्यपदार्थांचा खर्च डोईजड होत आहे.
मालेगाव (जि.नाशिक) : देव-देवता व ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रा साजरा करण्याची नाशिक जिल्ह्यासह खान्देशची शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम आहे. प्रसाद साहित्य, मनोरंजन, सौंदर्य प्रसाधने, खाद्यपदार्थ आदींच्या उलाढालीबरोबरच मनोरजंन म्हणून लोकनाट्य तमाशा व कुस्त्यांची दंगल यात्रांमुळे रंगत असते. कोरोनामुळे दहा महिन्यापासून यात्रा-जत्रा बंद आहेत. परिणामी, कुस्त्यांची दंगल व बक्षिसांची लयलूट थांबली आहे. कुस्त्या बंद असल्याने पहिलवानांना कसरतीसाठी खाद्यपदार्थांचा खर्च डोईजड होत आहे. नाशिक जिल्ह्यातील सात हजारावर पहिलवानांना कुस्त्यांच्या दंगलीची प्रतिक्षा आहे.
खाद्यपदार्थांचा खर्च परवडत नसल्याची खंत
जिल्ह्यात वर्षभर विविध देव-देवतांचा यात्रोत्सव लोकवर्गणीतून होतो. विशेषत: उन्हाळ्यात ग्रामदेवतांच्या यात्रा-जत्रा भरतात. दोन-तीन दिवसांच्या या यात्रांचे लाेकनाट्य तमाशा व कुस्त्यांची दंगल हे वैशिष्ट्य असते. कोरोनामुळे यात्रा बंद आहेत. शेकडो पहिलवान विविध जत्रांमध्ये आपले कसब पणाला लावतात. शंभर रुपयापासून २१ हजार रुपयापर्यंत बक्षीसे असतात. काही ठिकाणी भांडी व विविध वस्तुंवर कुस्त्या लावल्या जातात. अनेक पहिलवान जिंकलेल्या पैशातून आपला खुराक भागवितात. नियमित व्यायामाबरोबरच दुध, तुप, काजू, बदाम, मटण, मासे आदी खाद्य पदार्थ पहिलवान सेवन करतात. कुस्त्या बंद झाल्यामुळे पहिलवानही अडचणीत आले आहेत. काहींनी परिस्थिती अभावी नियमित व्यायाम बंद केला आहे.
हेही वाचा> दिव्यांग पित्याचे मुलाला अभियंता बनविण्याचे डोळस स्वप्न; कॅलेन्डर विक्रीतून जमवताय पै पै, असाही संघर्ष
लक्षवेधी ठरतात कुस्त्या...
पाच हजारावर बक्षीस असलेल्या कुस्त्या नावाजलेले पहिलवान लढतात. संयाेजक पहिलवानांना कुस्त्यांसाठी निमंत्रण पाठवतात. गाजलेल्या पहिलवानांमधील लढती कुस्त्यांची परंपरा टिकवून ठेवत आहेत. अखेरच्या कुस्तीत विजयी ठरलेल्या पहिलवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची पध्दत आजही कायम आहे. यात्रोउत्सव सुरु झाल्यानंतर कुस्त्यांचा फड शहरासह ग्रामीण भागात पुन्हा रंगू शकेल.
जिल्ह्यातील या गावांना होते लक्षवेधी कुस्त्यांची दंगल...
कळवण, ओझर, वडाळीभोई, ककाणी खेडगाव, पिंपळगाव वाखारी, देवळा, भेंडी, निवाणे, लखमापूर, जायखेडा, ताहराबाद, डांगसौंदाणे, साल्हेर, मुल्हेर, मांगीतुंगी, वणी, दिंडोरी, कृष्णगाव, वडनेर भैरव, कानमंडळ, शेलूपुरी, वाजगाव खर्डे, बेज, लोहणेर, ठेंगोडा, खालप, नामपूर, सोमपूर, वायगाव, सारदे, शेमळी, चौंधाणे, वटार, सातमाणे, रावळगाव, मालेगाव, सायने, अजंग-वडेल, वडनेर, डोंगराळे, नांदगाव, झोडगे, सौंदाणे, उमराणे, झाडी, गिरणारे, मनमाड, जळगाव नि., चोंढी, शिंगवे, लासलगाव, येवला, इगतपुरी, तामसवाडी, विंचूर, देवगाव, चांदवड, आडगाव, त्र्यंबकेश्वर, उगाव, शेवडी, आंबे-वरखेडा, जळूका, पालखेड, तळेगाव, खडक माळेगाव, खिरमाणी, द्याने, आसखेडा, पारनेर, निताणे, मुंगसे, नळकुस, करंजाळ, पिंगळवाडे, वीरगाव, वनोली, निफाड, सिन्नर, मीठसागरे, नैताळे, निळगव्हाण, वजीरखेडे, भायगाव, खडकी, दसाणे, पिंपळगाव.
‘‘कोरोना लाॅकडाऊनपासून कुस्त्यांच्या दंगली बंद आहेत. कुस्त्यांमध्ये १०१ रुपयांपासून २१ हजार रुपयापर्यंत बक्षिस मिळते. विविध ठिकाणच्या कुस्त्या जिंकुन पहिलवान त्यांच्या याचा परिणाम पहिलवानांच्या मेहनतीवर झाला आहे. शासनाने यात्रा-जत्रा सुरु केल्यास ग्रामीण भागातील पहिलवांना पुन्हा कुस्त्यांची संधी मिळेल.’’ - विष्णू चौधरी, (पहिलवान, लखमापूर)