धक्कादायक! तीक्ष्ण शस्त्राने गळा चिरून खून; नदीपात्रात फेकला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

शनिवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान उपनगर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोनवर जेलरोडला दसक येथील गोदावरीतीरी असलेल्या आढाव मळ्यातील हरी लॉन्स परिसरातील सात आंबे भागात एक युवक मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. उपनगर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

नाशिक : (नाशिकरोड) जेलरोड पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर दसक शिवारातील युवकाचा गळा चिरून मृतदेह गोदावरी पात्रात फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला. शनिवारी (ता. 27) सायंकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आलेल्या या प्रकारात उपनगर पोलिसांनी दोन तासांत दोन संशयितांना अटक केली. खुनातील फरारी असलेल्या मुख्य संशयिताच्या मध्यरात्री उशिरा पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. 

अशी आहे घटना

सागर संदीप अहिरे (20, भगवा चौक, शिवाजीनगर, जेल रोड) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याच्या वडिलांचे निधन झाले असून, आई आणि लहान भाऊ असा परिवार त्याच्यामागे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार शनिवारी सायंकाळी पाचच्यादरम्यान उपनगर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीने फोनवर जेलरोडला दसक येथील गोदावरीतीरी असलेल्या आढाव मळ्यातील हरी लॉन्स परिसरातील सात आंबे भागात एक युवक मृतावस्थेत असल्याची माहिती पोलिसांना दिली. उपनगर पोलिसांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे पुढे आले. पोलिसांनी जेल रोड भागातील अजय दीपक जाधव (वय 21) आणि राहुल रहाटळ (दोघेही रा. भगवा चौक) यांना अटक केली. तर मुख्य सूत्रधार राकेश घुमरे फरारी होता. मध्यरात्री उशिरा त्याच्या मुसक्‍या आवळण्यात पोलिसांना यश आले. 

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

खुनाचे कारण अस्पष्ट 

दरम्यान, मृत सागर अहिरे आणि त्याच्या खूनप्रकरणी अटक केलेले संशयित हे सगळे जण एकाच भागातील असल्याने या घटनेला स्थानिक नगरातील मैत्रीमधील वाद की प्रेमप्रकरण यापैकी काय पार्श्‍वभूमी आहे. हे मात्र उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. ही घटना नेमकी कशातून झाली याचा तपास सुरू आहे. मृतदेह सापडला ती जागा नदीपात्रात असून, तेथे झाडी आहेत. त्यामुळे खून तेथेच झाला की खून करून मृतदेह नदीपात्रात फेकला, याची माहिती घेण्याचे काम सुरू होते. मृत सागरसह तिघे संशयित एकाच भागातील रहिवासी असून, ते परस्परांचे परिचित असल्याने मुख्य संशयितासह त्यांच्या मित्रांकडे चौकशी केल्यावरच सत्य परिस्थिती समजेल, असे उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले. 

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A youth was killed in an incident in Dasak Shivara and his body was dumped in a river basin. Three people were arrested nashik marathi news