"उमवि' नामविस्तार सोहळ्याच्या तयारीला वेग 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

"उमवि' नामविस्तार सोहळ्याच्या तयारीला वेग 

"उमवि' नामविस्तार सोहळ्याच्या तयारीला वेग 

जळगावः महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये सुधारणा करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर झाले. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री, राज्यपाल याच्यासह मान्यवरांना निमंत्रण पाठविण्यात आले असून, विद्यापीठ प्रशासन नामविस्तार सोहळ्याच्या तयारीला लागले आहे. याबाबत अद्याप तारीख निश्‍चित नसली तरी बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीचे औचित्य साधले जाईल, असे गृहीत धरुन विद्यापीठ काम करत असून, तयारीला वेग आला आहे. 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती. शिवाय लेवा पंचायत अधिवेशनातही याचा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नागपूर येथे झालेल्या पावसाळी अधिवेशनात विद्यापीठ कायद्यात सुधारणा करून "उमवि'चा "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचे विधेयक विधानसभेत मांडले होते. या विधेयकास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. विद्यापीठाचे नामविस्तार करण्यावर शिक्‍कामोर्तब झाल्यानंतर हा सोहळा बहिणाबाई जयंतीला म्हणजेच शुक्रवारी (ता.11) होईल असे गृहीत धरण्यात आले आहे 

सोहळ्याबाबत निमंत्रण 
विधेयकाच्या मंजुरीनंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नामविस्तार सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी जाहीर केले होते. विधिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर दोन दिवसांनी विद्यापीठ प्रशासनाकडून सोहळ्यासाठी निमंत्रणासंबंधीचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री तावडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे. परंतु या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांची येण्याबाबत अनिश्‍चितता आहे. 

तयारीला वेग 
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा "कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ' असा नामविस्तार होणार असल्याने विद्यापीठाच्या तयारीला वेग आला आहे. त्यानुसार विद्यापीठस्तरावर नाव तयार करणे, प्रवेशद्वाराला रंगरंगोटीसह प्रशासकीय स्तरावरील संपूर्ण तयारी सुरू आहे. केवळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. 

बहिणाबाईंच्या आठवणींना उजाळा 
नामविस्तार सोहळ्याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, यासाठी विशेष वस्तू ठेवण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, नामविस्तार सोहळ्यासाठी विद्यापीठात विविध तीस समित्या गठित करण्यात आल्या असून, सर्व समित्या तयारीला लागल्या आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: वेग