शेतमजुराच्या लेकीला 28 लाखांचे पॅकेज! 

जगन्नाथ पाटील
बुधवार, 4 डिसेंबर 2019

कापडणेः दिवसाला जेमतेम 200 रुपयांच्या मोलमजुरीवर गुजराण करणाऱ्या भामरे कुटुंबातील स्नेहलला जगविख्यात "गुगल' कंपनीकडून वार्षिक तब्बल 28 लाख रुपयांच्या पॅकेजवर कॅम्पस इंटरव्ह्यूतून नोकरी बहाल झाली. या यशातून स्नेहलने मोलमजुरी करणाऱ्या आपल्या माता- पित्यांचे पांग फेडल्याची भावना व्यक्त होत असून, स्नेहलच्या या यशाने संपूर्ण कापडणेकर ग्रामस्थ हर्षोल्हासात बुडाले आहेत. भामरे कुटुंबावर आज दिवसभर कौतुकाचा वर्षाव सुरूच होता. 

कापडणेः दिवसाला जेमतेम 200 रुपयांच्या मोलमजुरीवर गुजराण करणाऱ्या भामरे कुटुंबातील स्नेहलला जगविख्यात "गुगल' कंपनीकडून वार्षिक तब्बल 28 लाख रुपयांच्या पॅकेजवर कॅम्पस इंटरव्ह्यूतून नोकरी बहाल झाली. या यशातून स्नेहलने मोलमजुरी करणाऱ्या आपल्या माता- पित्यांचे पांग फेडल्याची भावना व्यक्त होत असून, स्नेहलच्या या यशाने संपूर्ण कापडणेकर ग्रामस्थ हर्षोल्हासात बुडाले आहेत. भामरे कुटुंबावर आज दिवसभर कौतुकाचा वर्षाव सुरूच होता. 

जि. प. शाळा ते पवई आयआयटी 
येथील स्नेहल दिनेश भामरेचे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक दोनमध्ये प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासून हुशार विद्यार्थ्यांत गणना होणाऱ्या स्नेहलने पाचवीत असताना जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण केली. यामुळे मेहेरगाव (ता. धुळे) येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे शिक्रापूर (जि. पुणे) येथील जवाहर नवोदय विद्यालयातच तिने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. तेथील "आयआयटी' प्रवेशासाठीच्या मोफत अभ्यासवर्गाचा तिला फायदा झाला अन्‌ बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत, तर आयआयटी प्रवेश परीक्षेतही तिने विशेष गुणवत्ता प्राप्त केल्याने तिला पवई येथील आयआयटीत प्रवेश मिळाला. आता स्नेहल "एम टेक'च्या अंतिम वर्षात आहे. 

दहावी- बारावीतही गुणवत्तेतच 
स्नेहलची पाचवीत नवोदयपासून गुणवत्तेची यशोमालिका सुरूच आहे. दहावी व बारावीत तिने अनुक्रमे 98.40 व 95.60 गुण मिळविले. "आयआयटी'तही गुणवत्ता यादीत येत ती विविध शिष्यवृत्तींची मानकरी ठरली. 

"गुगल'साठी 20 तास अभ्यास 
स्नेहलचा "गुगल' कंपनीत निवड व्हावी यासाठी चक्क 20 तास अभ्यास सुरू होता. पहाटे चारपर्यंत आणि परत सकाळी सहाला आईने फोन केल्यानंतर उठायचे अन्‌ अभ्यास करायचा असा तिचा नित्यक्रम आजही सुरू आहे. "गुगल' कंपनीतर्फे तिची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली अन्‌ युरोपमधील "ब्लिसबंड'मध्ये दोन महिने तिने इंटर्नशिप पूर्ण केली. त्यासाठीही तिला दीड लाखांचे पॅकेज मिळाले होते. स्नेहलला मिळालेल्या वार्षिक "पॅकेज'ने कापडणे येथील ग्रामस्थ अचंबित झाले आहेत. तिच्या यशाबद्दल, गरीब कुटुंबातील माता- पित्यांसह जिल्हा परिषद शाळा व गावाचेही नाव उज्ज्वल केल्याबद्दल भामरे कुटुंबावर आज दिवसभर कौतुकाचा वर्षाव झाला. 

स्नेहल आमची लेक नव्हे, तर मुलगाच आहे. तिच्या इच्छेनुसार आम्ही तिला शिक्षण घेण्याची मुभा दिली. मोलमजुरी केली, मात्र तिला कधीच आर्थिक चणचण भासू दिली नाही. लेकीने आमच्या कष्टांचे चीज केले. 
 दिनेश भामरे, अनिता भामरे, कापडणे, ता. धुळे 

आई, पप्पा, तुमच्या मेहनतीचे आणि माझ्या अभ्यासाचे चीज झाले. मला परदेशात, नव्हे देशातच सेवा करायची आहे. "गुगल'ने देशातील सेवेसाठी निवड केली आहे. मला हवे असलेले पॅकेजही मला मिळाले आहे. आई आणि पप्पा, मी आता खूश आहे. 
 स्नेहल दिनेश भामरे, कापडणे, ता. धुळे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 28 lakh package for kapdne farm laborers girl!