रस्ता 50 फूट; अतिक्रमण 30 फूट : देवपूरची विदारक स्थिती | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road encroachment on devpur road

रस्ता 50 फूट; अतिक्रमण 30 फूट : देवपूरची विदारक स्थिती

धुळे : महापालिका (Municipality) क्षेत्रात सर्वाधिक गतीने विस्तार होत असलेला भाग म्हणजे देवपूर होय. या भागाची लोकसंख्या दीड लाखांहून अधिक आहे. कुठलेही नियोजन नाही.

सोयीसुविधांची वानवा आणि शहर सुधार आराखडा बासनात ठेवत अधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी देवपूरला समस्यांच्या खाईत लोटले आहे.

सहनशील मतदार निमूटपणे ही स्थिती सोसत आहेत. परिणामी, मोठ्या पुलालगत दुभाजकासह रस्ता ५० फूट आणि अतिक्रमण (Encroached) ३० फूट, अशी विदारक स्थिती देवपूर अनुभवत आहे. (30 feet Encroachment on 50 feet road road of Deopur dhule Latest Marathi news)

देवपूर हा आजी-माजी लोकप्रतिनिधी, महापालिकास्तरावर सर्वाधिक दुर्लक्षाचा भाग ठरला आहे. व्यापारी संकुले, मंडई, दवाखाना, शाळा आदी सोयीसुविधा तर सोडाच; एखादे स्वच्छतागृह, कचरा कुंड्या या भागात नाहीत.

मोठ्या पुलानंतरचा भाग देवपूरमध्ये गणला जातो. महापालिकेचे कर व वीजबिल अधिकाधिक प्रमाणात नियमितपणे भरणारा हा भाग आहे. तरीही विविध समस्यांशी हा भाग झुंजतो आहे. देवपूरमधून संकलित होणारा कररूपी कोट्यवधींचा निधी नेमका जिरतो कुठे? याचे ‘व्होटर ऑडिट’ करण्याची वेळ आली आहे.

रुग्णवाहिकांनाही अडसर

देवपूरमधून जुना मुंबई-आग्रा महामार्ग अर्थात आग्रा रोड जातो. नगावबारी चौफुलीपासून नेहरू चौक, गांधी पुतळा ते पाचकंदील, पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मार्ग आहे. या मार्गाची स्थिती अत्यंत दयनीय आहे.

दुतर्फा वाढती अतिक्रमणे, मालमत्ताधारकांची वाढीव बांधकामातील अतिक्रमणे आदींमुळे वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या जटिल आहे. एखादी एसटी, ट्रॅव्हल्स, ट्रक, कार रस्त्यावर आली तर ती जोपर्यंत मोठ्या पुलालगत वळणावर अंडाकृती बगीचा व तेथून स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापर्यंत पोचत नाही, तोपर्यंत रुग्णवाहिका किंवा अन्य कुठलेही वाहन सुकरपणे पुढे जाऊच शकत नाही.

इतकी भयाण स्थिती आग्रा रोडवर झाली आहे. त्याविषयी आजी-माजी लोकप्रतिनिधी, अधिकारी एक शब्द बोलायला तयार नाहीत.

कुठलाही धाक नाही

आग्रा रोड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. मोठ्या पुलापासून सुशी नाला, तेथून थेट जीटीपी स्टॉपपर्यंत मोठ्या प्रमाणावर दुतर्फा अतिक्रमणे झाली आहेत. प्रामुख्याने देवरे ॲक्सिटेंड हॉस्पिटलपासून जीटीपी स्टॉपपर्यंतचा रस्ता ‘मौत का कुँवा’ ठरेल, अशा पद्धतीने वाटचाल करत आहे.

महापालिका, वाहतूक पोलिसांचा कुठलाही धाक नसल्याने भररस्त्यावर दुतर्फा भाजीविक्रेते, विविध व्यावसायिक, बेशिस्त पार्किंग आदी विविध समस्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. दत्तमंदिर चौकातील सिग्नलपासून जीटीपी स्टॉप परिसरापर्यंतच्या अतिक्रमणांनीच हा रस्ता व्यापला आहे. त्यामुळे एसटी, रुग्णवाहिकेला या रस्त्यावरून जाणे कठीण बनले आहे. मग या स्थितीत वाहतुकीची कोंडी फुटेल कशी?

हेही वाचा: तिघे सराईत चैनस्नॅचर जेरबंद; 7 तोळे सोने जप्त

दुसऱ्या ‘पाचकंदील’ची निर्मिती

देवपूर भागात पाच प्रभाग असून, २० नगरसेवक आहेत. एमआयएमचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेचा प्रत्येकी एक आणि उर्वरित भाजपचे १४ नगरसेवक आहेत. खासदार व

आमदारकीच्या निवडणुकीत देवपूरकडून अधिकतर एकगठ्ठा मतदान मिळविण्याचा प्रयत्न होतो. तरीही देवपूरला सोयीसुविधांपासून वंचित ठेवले जाते. या भागात विकासाचा अनुशेष वाढता आहे.

वर्दळीच्या व संवेदनशील पाचकंदील मार्केटप्रमाणे देवरे हॉस्पिटल ते जीटीपी स्टॉपपर्यंत नवीन पाचकंदील मार्केट निर्माण झाल्याची स्थिती देवपूरवासीय अनुभवत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी, पार्किंगची समस्या जटिल बनली आहे.

हेही वाचा: पुतण्यानेच मारला पावणे दोन लाखांवर डल्ला; घरफोडीची 24 तासात उकल

Web Title: 30 Feet Encroachment On 50 Feet Road Road Of Deopur Dhule Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..