
ABHA Health Card : ‘आभा’मुळे नागरिकांचे जीवनमान उंचावेल; आमदार जयकुमार रावल
निमगूळ (जि. धुळे) : दोंडाईचा शहरात सर्वसामान्यापासून ते सर्व पिवळे, केशरी शिधापत्रिकाधारक नागरिकांसाठी आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी भारतीय जनता पक्ष शहरातर्फे
दोंडाईचा शहरात मोफत आयुष्यमान भारत (आभा) हेल्थ कार्ड मोफत नोंदणी सुरू करण्यात आली असून, त्यातील कार्डचे प्रातिनिधिक वाटप आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते जनदरबार कार्यालयात करण्यात आले. (abha health card free Allotment by MLA Jaykumar Rawal dhule news)
या वेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती महावीरसिंह रावल, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष कामराज निकम उपस्थित होते.
आमदार जयकुमार रावल म्हणाले, की समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यविषयक जागृती व सर्वसामान्यांसाठी मोफत उपचार होऊन आयुर्मान वाढावे यासाठी योजनेची सुरवात केली आहे. नवीन अर्थसंकल्पात या योजनेत दीड लाखाऐवजी पाच लाख इतकी तरतूद करण्यात आल्यामुळे दुर्धर आजाराच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.
प्रवीण महाजन म्हणाले, की आयुष्यमान भारत योजनेचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना घेता यावा व जनतेच्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत यासाठी योजना विस्तारित करण्यात आली असून, योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे हेल्थ कार्डवरील बारकोडमध्ये आपल्या आरोग्याची सर्व माहिती संकलित केलेली असेल.
हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...
त्यामुळे कार्डधारकांना शरीराच्या तपासण्या वारंवार कराव्या लागणार नाहीत. रुग्णालयातील उपचार काळात रुग्णांना मोफत जेवण व प्रवासभत्ता मिळेल, तसेच दोंडाईचा शहरातील सर्व नागरिकांसाठी आमदार जयकुमार रावल यांच्या संकल्पनेनुसार शिबिराचे प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले असून, लॅमिनेशन आभा कार्डचे वाटप आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, सरचिटणीस कृष्णा नगराळे, भरतरी ठाकूर, जितेंद्र गिरासे, पंकज चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले आहे. दोंडाईचा शहरातील नागरिकांची मोफत नोंदणी यशस्वी करण्यासाठी पंकज ठाकूर, प्रमोद कोळी, भारती कोळी, नमिता कोळी, हर्षदा कोळी, भगवान माळी, प्रल्हाद पाटील, महेंद्र महाजन, सागर गिरासे, अंकुश वारुळे यांनी प्रयत्न केले.