जैताणे येथील सेंट्रल बँकेचा पाच दिवसानंतर व्यवहार सुरळीत

प्रा. भगवान जगदाळे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सुमारे ३० ते ३२ गावे जोडलेल्या जैताणे (ता. साक्री) येथील सेंट्रल बँक शाखेचे कामकाज तांत्रिक अडचणीमुळे सलग पाच दिवसानंतर बुधवारी (ता. २५) दुपारी दोनच्या सुमारास सुरू झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे खेड्यापाड्यावरील ग्राहक व शेतकऱ्यांची मात्र पाच दिवस चांगलीच दमछाक झाली. दुसाणे शाखा यापूर्वीच बंद झाल्याने जैताणे शाखेला परिसरातील ३० ते ३२ गावे जोडल्यामुळे यंत्रणेवर मोठा ताण पडतो.

तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवार (ता. २०) पासून सेंट्रल बँक शाखेचे कामकाज बंद होते. त्यामुळे ग्राहक चांगलेच हतबल झाले होते. बुधवारी (ता. २५) सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास सेंट्रल बँक शाखेला कुलूप लावलेले आढळून आले. ग्राहकही उन्हातान्हात ताटकळत बसले होते. म्हणून यासंदर्भात बँक प्रशासन व बीएसएनएल विभागाशी संपर्क साधला असता, 'सुरुवातीस केबलची समस्या व त्यानंतर मोडेम खराब झाल्याने बिघाड दुरुस्तीस विलंब झाला' असे सांगण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला. यावेळी ग्राहकांना झालेल्या मनःस्तापाबद्दल संबंधितांनी 'सकाळ'कडे दिलगिरीही व्यक्त केली. यापुढे अविरत सेवा पुरवू असे आश्वासनही दिले. त्यानंतर ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून बँक प्रशासनाने कामकाजाची तासाभराची वेळ वाढवून दिली.

ग्राहकांसाठी सुविधांचा अभाव...
येथील ग्रामपंचायत चौकातील सेंट्रल बँक शाखेत ग्राहकांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची बाके, पिण्याचे पाणी, सावली आदी सुविधा उपलब्ध नाहीत. छोटीशी इमारत असल्याने खूपच गर्दीही होते. पायऱ्या उंच असल्याने वयोवृद्ध व्यक्ती त्यावरून खाली पडण्याची दाट शक्यता आहे. पार्किंगची सुविधा नसल्याने ग्रामपंचायत चौकात वाहनांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे अपघातांची शक्यताही बळावली आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्याचीही गरज आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत त्वरित उपाययोजना करावी. अशी मागणी जैताणेतील सामाजिक कार्यकर्ते रामदास दगा भदाणे यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After five days transaction is smooth the Central Bank of Jaitane